पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/७५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलेल्या नोटा डॉक्टरांना दिल्या होत्या. पण आम्ही पुन्हा जुळेवाडीत जाऊ शकत नव्हतो. डॉक्टर सावध झाले होते. शिवाय ते आम्हाला चांगलंच ओळखत होते. अखेर वनिताला त्याच माणसाच्या गाडीतून क-हाडपर्यंत यायला सांगितलं. आम्ही रस्त्यातच थांबलो होतो. त्याच्या गाडीच्या मागून आम्ही कहाडच्या हद्दीत प्रवेश केला. पण दरम्यानच्या काळात त्याची त्यावेळी क-हाडच्या पोलिस निरीक्षकांनी वाहतूक पोलिसांना संबंधित क्रमांकाची गाडी अडवायच्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. क-हाडच्या मार्केट यार्डजवळ येताच त्याची गाडी अडवून वाहतूक पोलिस थेट त्याच्या गाडीतच जाऊन बसला. गाडीच्या बाबतीत काहीतरी गडबड झाली आहे, आपल्याला आता आरटीओ ऑफिसला जावं लागणार, असं त्याला वाटत असतानाच पोलिसानं त्याला गाडी कॉटेज हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं, तेव्हा मात्र तो बिथरला. कॉटेज हॉस्पिटलमल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे त्याला आणलं; पण तो काही बोलायला तयार होईना. तेव्हा मात्र मी आणि शैलाताईंनी त्याला स्वतंत्र खोलीत नेलं आणि कौशल्य पणाला लावून बोलतं केलं. तोपर्यंत कॉटेज हॉस्पिटलमध्ये पत्रकार येऊन दाखल झाले होते. त्यांच्यासमोर तो घडाघडा बोलायला लागला. त्याच्याबरोबर त्याचा क्लीनरही होता.क्लीनरकडे मधूनच तो बघायचा आणि म्हणायचा, “गयी रे गयी... पूरी गयी.

 त्यानं दिलेल्या माहितीनुसार, जुळेवाडीच्या क्लिनिकवर कारवाईला पथक गेलं, तेव्हा मात्र तिथलं सोनोग्राफी मशीन गायब झालं होतं. 'मशीन दुरुस्तीसाठी पुण्याला पाठवलंय, असं डॉक्टर सांगू लागले. मग मात्र आम्ही मशीन ज्याच्याकडे दुरुस्तीला दिल्याचं तो सांगत होता, त्यालाच पकडून आणायला लावलं. या निमित्तानं यंत्रणांमधल्या पोकळीचा कसा गैरफायदा घेतला जातो, याचा आम्हाला जवळून अनुभव आला. जुळेवाडीच्या त्या डॉक्टरांविरुद्ध पहिला गुन्हा नोंदवला गेला, त्याला तीन वर्ष उलटली होती. त्या खटल्याचा निकाल तर अजून लागला नव्हताच; शिवाय सोनोग्राफी मशीनचाही दुरुपयोग डॉक्टरांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरही तब्बल तीन वर्ष केला होता. नोंदणी न केलेलं मशीन डॉक्टरांकडे दिलं गेलं, तिथंच

७१