पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करावी लागते, असंही सांगितलं. तोपर्यंत कैलास गावात चौकशी करत होता आणि त्याला यशही आलं होतं. 'मी काम करून देईन, अशी हमी देणारा एक माणूस त्याला भेटला होता. थोडक्यात, त्याच्या आईकडे तपासणीसाठी जायचं असेल, तर त्याचीच गाडी भाड्यानं घ्यावी लागत होती आणि त्याची आईही दुसऱ्या कुणाकडून आलेले पेशंट स्वीकारत नाही, असा हा मामला असल्याचं लक्षात आलं. 'दोन-तीन दिवसांनी जाऊया. फोन करून येतो, असं कैलासनं त्या माणसाला सांगून टाकलं.

 ठरल्या दिवशी त्याला फोन केला आणि एका गर्भवतीला घेऊन आम्ही आणखी एका मोहिमेवर निघालो. देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये एचआयव्हीविषयी जागृतीचं काम आम्ही करीत होतो. गर्भवती महिला त्यातलीच एक. परंतु या व्यवसायात असूनसुद्धा ती अशा प्रकारच्या कारवाईसाठी तयार झाली, हे विशेष! त्या माणसाच्या गाडीत तिला घेऊन आमची कार्यकर्ता वनिता आणि वनिताच्या पतीला पाठवलं आणि आम्ही दुसऱ्या गाडीतून त्या गाडीचा सुरक्षित अंतरावरून पाठलाग करू लागलो. 'आईकडे जावं लागेल. ती पुढे घेऊन जाईल, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु त्याच्या आईचं क्लिनिक खूपच मागे पडलं होतं आणि त्याची गाडी क-हाडच्या दिशेला लागली होती. आम्हाला आश्चर्य वाटलं; पण तो मात्र गाडी भलत्याच आडमार्गानं दामटत राहिला. कृष्णा साखर कारखान्याजवळ आम्ही पोहोचलो, तेव्हा त्याची गाडी आम्हाला दिसेनाशी झाली. इथून पुढे तो कुठे गेला, हेच कळेना. अखेर वनिताला फोन करून विचारलं, तेव्हा मोठा धक्का बसला. ती म्हणाली, 'आम्ही जुळेवाडीत आलोय. म्हणजे, एक खटला डोक्यावर असताना तिथल्या डॉक्टरांनी पुन्हा व्यवसाय सुरूही केला होता. सोनोग्राफी मशीन त्यांना परत करणं सिव्हिल सर्जनना नव्हे, तर ग्राहकांना महागात पडलं होतं. कारण तपासणीचा पूर्वीचा अडीच हजार रुपये दर जवळजवळ तिप्पट वाढून सहा हजार झाला होता!

 जुळेवाडीच्या पहिल्या मोहिमेत कैलास, शैलाताई सगळे होते. यावेळी फक्त वनिताच्या पर्समध्ये ठेवलेला मोबाइल आणि त्यावर झालेलं थोडंफार रेकॉर्डिंग एवढाच पुरावा हाताशी होता. शिवाय, नंबर नोंदवून प्रतिज्ञापत्र

७०