पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/७१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्यांनी घडवायची, त्या शिक्षकांचं एक नेटवर्कच भावी पिढीतल्या मुलींची संख्या कमी करण्याच्या कामात सक्रिय झालं होतं. सातारा, सांगली, कन्हाड, इस्लामपूर भागात हे नेटवर्क काम करत होतं.

 डॉक्टरांच्याबद्दल अशीही माहिती मिळाली होती की, राजकारणातल्या वजनदार व्यक्तींशी त्यांचा जवळचा संबंध आहे. खुद्द गृहमंत्री त्यांच्यासाठी जेवायला थांबले होते, असे किस्से लोक ऐकवायचे. त्यांचे वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सेनेत होते आणि डॉक्टर जवळ हत्यारं बाळगतात, अशीही माहिती मिळाली होती. आणखी एक गमतीशीर माहिती म्हणजे 'संजा नावाचा एकजण त्यांच्या हाताखाली काम करायचा. डॉक्टर त्याला सगळं समजावून सांगायचे. बघून-बघून संजा 'या कामातसुद्धा तरबेज झालाय, असं समजलं होतं. क-हाडच्या कॉटेज हॉस्पिटलच्या अखत्यारीत त्यांचं क्लिनिक येत असल्यामुळं येता-येता आम्ही कारवाईची कल्पना कॉटेज हॉस्पिटलला दिली होती. अशा वेळी आम्ही या हद्दीत कारवाई करणार आहोत, एवढीच माहिती देतो. नेमकी कुठल्या क्लिनिकवर कारवाई करणार, हे सांगत नाही. आम्ही गेलो तेव्हा डॉक्टर बाहेर गेले होते. नंबर लावून आम्ही वाट पाहत बसलो.

 डॉक्टर आल्यानंतर त्यांनी कविताला तपासलं आणि तिच्या पोटात मुलगा आहे, असं तोंडी सांगितलं आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट दिला. आम्ही कॉटेज हॉस्पिटलला फोन केला, तेव्हा तिथले वैद्यकीय अधिकारी सातारला गेल्याचं कळलं. मग कारवाई करायला येणार कोण? तिथं आम्ही थांबणार तरी किती वेळ? कविताच्या पोटात मुलगी असती, तर गर्भपातासाठी थांबलो आहोत, असं कारण तरी देता आलं असतं. पण मुलगा आहे, हे कळल्यावरसुद्धा थांबलो तर संशय येणार. शेवटी सिव्हिल हॉस्पिटलला फोन केला. सिव्हिल सर्जननी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पाठवलं. पण ते जुळेवाडीत पोहोचेपर्यंत करायचं काय? दवाखान्यातून बाहेर गेलो आणि कागदपत्रं गायब झाली तर? शिवाय आम्ही प्रतिज्ञापत्रावर नंबर नोंदवलेल्या नोटाही आतून गायब होण्याची भीती. तोच मोठा पुरावा होता. अडीच हजार रुपये घेतले होते डॉक्टरांनी तपासणीचे! अखेर एक कल्पना सुचली. कृष्णा साखर कारखान्यावरून आम्हाला न्यायला गाडी येणार आहे, असं कारण सांगून आम्ही वाट पाहू लागलो.

६७