कविताचा नवरा अचानक इतक्या लांबून कसा काय आला, याचं आम्हाला आश्चर्यच वाटलं! कविताचं माहेर सातारा आणि सासर वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातलं. नवऱ्याच्या दारूमुळं सतत भांडणं होत होती म्हणून कविता घरातून निघून माहेरी आली होती. तिचा नवरा तिला घ्यायला नव्हे, तर भांडायला आला होता; पण भांडणाचं कारण वेगळंच होतं. कविता त्याला चक्क टीव्हीवर दिसल्यामुळं त्याचा पारा चढला होता. बीडच्या डॉक्टरांच स्टिंग ऑपरेशन करताना बनावट गि-हाइक म्हणून आम्ही कविताला सोबत नेलं होतं आणि हे प्रकरण माध्यमांमध्ये गाजलं होतं. आपल्या अपरोक्ष बायकोनं असं काहीतरी केल्याची सल तिच्या नवऱ्याला टोचत होती. पण मग कैलासनं त्याची समजूत घातली. हे काम किती महत्त्वाचं आहे, हेही सांगितलं आणि तेवढ्यात पुढच्या कारवाईची परवानगीही शिताफीनं काढून घेतली. यावेळी कविताबरोबर तिच्या नवऱ्यालाही घेऊन जायचं ठरलं. पत्रकारांनी विचारलं तर नवरा-बायको दोघंही आमच्यासोबत आहेत, असंही सांगता येईल.
यावेळी जरा वेगळाच मामला आमच्यासमोर होता. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी दवाखान्यातला डॉक्टरच त्याच्या खासगी क्लिनिक गर्भलिंगचिकित्सा करतो, असं समजलं होतं. आमच्या एका पत्रकार मित्रानं ही माहिती काढली होती. जुळेवाडी या सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या हद्दीवरच्या गावात या डॉक्टरांचं क्लिनिक होतं. आपल्याकडच्या सरकारी यंत्रणांमध्ये ज्या गमतीजमती दिसतात, त्या या प्रकरणात पहिल्या क्षणापासून दिसायला लागल्या होत्या. डॉक्टरांच्या क्लिनिकची इमारत सातारा जिल्ह्याच्या हद्दीत तर परसबाग सांगली जिल्ह्याच्या हद्दीत! त्यांच्याबद्दल जी माहिती समजली होती, ती हादरवून टाकणारी होती. सोनोग्राफी आणि गर्भपात केल्यानंतर ते पेशंटला ज्या खोलीत ठेवतात, तिला बाहेरून कुलूप घालतात, अशी माहिती मिळाली होती. जुळेवाडी फाट्यावर गाडी लावून आम्ही त्याच्या दवाखान्यात गेलो, तेव्हाच बाहेरून कुलूप लावलेल्या खोल्या आम्हाला दिसल्या. डॉक्टरांकडे येणाऱ्यांमध्ये शिक्षकांची संख्या मोठी होती. भावी पिढी