पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
एकावर पाच फ्री

माझ्या मतदारसंघात जर कुणी गर्भलिंगचिकित्सा करताना आढळला, तर गाढवावरून धिंड काढेन, अशी गर्जना करणारा गृहमंत्री राज्याला लाभल्याचा आनंद होताच; पण त्याच मतदारसंघात पलूस, तासगाव, बत्तीस शिराळा आणि वाळवा भागात मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत घटत चाललंय, असं आकडेवारी सांगत होती. या मतदारसंघात खरोखर असे प्रकार घडत नसतील का? सावळज, ताकारी, लोणारी भागात असे प्रकार सुरू आहेत, असं पेशानं डॉक्टर असलेल्या व्यक्तीकडूनच समजलं होतं. कार्यकर्त्यांनी हा भाग बघायचा, असं ठरवलं. दोन गर्भवती महिला डोळ्यापुढं होत्या. एक म्हणजे, घरकाम करणारी रेखा. तिच्या नवऱ्यानं आधी रेखाच्या बहिणीशी आणि नंतर रेखाशी लग्न केलेलं. रेखाला पहिली मुलगी होती. तिचा नवरा साईभक्त. शिर्डीला नेहमी जाणारा.

 दुसरी गर्भवती म्हणजे सुनीता. ती कैलासची नातेवाईक. चार महिन्यांची गर्भवती. दोघींना घेऊन आधी तासगावला गेलो, कारण तासगावच्या एका हॉस्पिटलबद्दल पक्की खबर मिळाली होती. इथला एक कर्मचारी गर्भलिंगनिदानास इच्छुक असलेल्या महिलांना सावळजला घेऊन जातो, अशी ही खबर होती. तासगावला एक कम्पाउंडर भेटला. 'मुलगा-मुलगी बघायचंय, हे वाक्य चेहऱ्यावर अचूक भाव आणून दबक्या आवाजात बोलण्याच्या अभिनयाला कार्यकर्ते आता सरावले होते. "हे डॉक्टर करत नाहीत. दुसरे डॉक्टर करतात. बघून सांगतो. आता खूप कडक झालंय. पैसे जास्त लागतील, ही माहिती तितक्याच दबक्या आवाजात कम्पाउंडरनं 'विमल पाटील यांना दिली. विमल पाटील म्हणजे शैलाताई! नात्यातल्या दोन गर्भवती एकाच वेळी समोर बघून कम्पाउंडरला खात्री पटली. प्रत्येकी दहा हजार म्हणजे दोघींचे वीस हजार, असा दरही त्यानं सांगून टाकला. 'उद्या येऊ का, हा प्रश्न ऐकून कम्पाउंडरला खात्री पटली की, पैशांची जुळणी करण्यासाठीच चोवीस तास हवेत. त्यानं होकार भरला. एवढंच नव्हे, तर नात्यागोत्याच्या, ओळखीपाळखीच्या आणखी कुणी गर्भवती असतील तरी एकदमच सगळ्यांना घेऊन येण्याचा सल्लाही दिला.

५७