Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सापडतील, याविषयी कार्यकर्ते त्यांना फोनवरून सांगत होते. कार्यकत्यांनी स्टिंग ऑपरेशनच्या वेळी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. 'सोळा' आकडा लिहिलेला चतकोर कागद आणि माझ्या फोनवर केलेलं रेकॉर्डिंग याखेरीज आमच्याकडे पुरावा काय होता? ही मंडळी आमच्या हॉस्पिटलमध्ये आलीच नव्हती, असा बचाव डॉक्टरांनी घेतला तर...? त्यामुळं कार्यकत्यांनी काही ठिकाणी आपण येऊन गेल्याचं रुग्णालयातच ठिकठिकाणी तारीख आणि वेळेसह लिहून ठेवलं होतं... वॉशरूममध्ये फ्लशच्या टाकीखाली... टॉयलेटच्या भिंतीवर... बाकाच्या खाली... फोनवर कार्यकर्ते ती ठिकाणं प्रांताधिकाऱ्यांना सांगत होते. पण...

 प्रांताधिकारी प्रत्येक ठिकाणी पोहोचून निरीक्षण करीत राहिले; पण त्यांना कुठेच, कसलाच मजकूर दिसला नाही... छापा पडल्यावर हॉस्पिटलातल्या संशयास्पद गोष्टी गायब झाल्या होत्या... ती कुत्रीही! पण हा मजकूर कुठं गेला? कसा गेला? आम्हालाही कळत नव्हतं आणि प्रांताधिकाऱ्यांनासुद्धा! उलट त्यांनी तिकडून जी माहिती दिली, ती आम्हाला जास्तच अस्वस्थ करणारी ठरली. ते म्हणाले, "अहो, पुराव्यांचं काय घेऊन बसलाय! ते तर कुठेच नाहीत. उलट छापा पडल्यावर हॉस्पिटलसमोर बोर्ड लागलाय. त्यावर लिहिलंय - 'आज हॉस्पिटल बंद राहील. छापा पडणार आहे!' ...आता बोला!" भुवया उंचावण्यापलीकडे तूर्त तरी हातात काहीच नव्हतं! हातात होती फक्त एक चिठोरी आणि एक कॉल रेकॉर्डिंग!

५६