पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अडथळ्यांची शर्यत


 डिस्कळच्या महिला मंडळातल्या बायका बोलायला अगदी मोकळ्या. याच मंडळातल्या बायडा मावशींकडून एका डॉटरांचं नाव ऐकलं. ते पुसेगावला गर्भवतींची तपासणी करतात आणि त्यांच्याकडे लिंगनिदानासाठी बायका जातात, अशी पक्की माहिती बायडा मावशींना होती. पुसेगाव हे खटाव तालुक्यात मध्यवर्ती गाव. आजूबाजूच्या गावांमधल्या बायकांना तिथं तपासणीसाठी जाणं सोयीचं होतं. त्यामुळं त्यांच्याकडे गर्दीही खूप असते, अशी माहिती मिळाली. पुसेगावच्या बसस्टैंडपासून फलांगभर अंतरावर डॉटरांच्या हॉस्पिटलची तीन मजली बिल्डिंग. तिथं घडत असलेल्या प्रकारांची माहिती मिळाली, तेव्हा मंडळातली एक महिला गरोदर होती. तिची ही तिसरी वेळ. पहिल्या दोन मुलीच. पण सततच्या बाळंतपणांनी ती फारच अशक्त झालेली. हिमोग्लोबिन चारवर आलेलं. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. अन्नान्नदशा म्हटलं तरी चालेल. एका वेळी दोनच माणसं मावतील एवढं छोटंसं घर. नुसते दगड एकावर एक रचून तयार केलेल्या भिंतींचं. डॉटरांच्याकडे तपासणीला तिला न्यायचं ठरलं. तिला बोलावून घेतलं. सगळं समजावून सांगितलं. त्या गर्भवती महिलेच्या एका मुलीला तिच्या सासूजवळ ठेवलं. डॉटर तपासणीसाठी दोन हजार रुपये घ्यायचे. ती रक्कम महिलेकडं देऊन तसं अंडरटेकिंग स्टैपपेपरवर घेतलं. सिव्हिल सर्जनना आमच्या मोहिमेची माहिती कळवली. ते स्वतःच येतो म्हणाले. परंतु अधिकृतरीत्या वडूजच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बोलावणं आवश्यक होतं.

 हॉस्पिटलमध्ये गेल्या-गेल्या पहिला धक्का बसला. हॉस्पिटलमध्ये जागोजागी बाटल्यांमध्ये मानवी अवयव ठेवल्याचं दिसलं. खरं तर ते स्त्रीरोगतज्ज्ञ होते; सर्जन नव्हे. तरी हे अवयव हॉस्पिटलमध्ये कसे काय ठेवलेत, हेच कार्यकर्त्यांना समजेना. मी आणि कैलास लांब रस्त्यावर गाडीतच थांबलो होतो. हॉस्पिटलमधून बाहेर पडणाऱ्या काही पेशंटना कैलास गाठत होता. त्याच्याकडे ओळखी काढण्याचं, बोलण्याचं भलतंच कौशल्य. त्याचा पुरेपूर वापर करून त्यानं काही पेशंटच्या हातातल्या फायली मिळवल्या

४४