घटनेसंबंधी सविस्तर माहिती दिली. हा 'मेडिकल क्राइम' नसल्यामुळं महापालिकेचे आरोग्य अधिकारीच तक्रारदार असणं स्वाभाविक होतं. ही पोलिस केस नव्हती. तरीसुद्धा बंदोबस्ताला यावं लागलं म्हणून पोलिस खट्ट झाले.
२००५ मध्ये केलेल्या या स्टिंग ऑपरेशनचा खटला २०१० मध्ये सुरू झाला. साक्षीदार, प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या साक्षी झाल्या. शैलाताई, माया यांचे जाबजबाब नोंदवले गेले. सगळ्यात शेवटी मुमताजची साक्ष होती. तिला भेटून आलो. दरम्यानच्या काळात ती बचत गटात काम करू लागली होती. 'उद्या घरी येते,' असं म्हणाली. दुसऱ्या दिवशी ती आली. आम्ही पोहे खात-खात तिला साक्ष देताना मानसिक संतुलन कसं राखायचं, याची माहिती दिली. उलटतपासणीबाबत मानसिकदृष्ट्या तयार केलं. ठरलेल्या तारखेला आम्ही कोल्हापूरला गेलो. “माझं काही चुकलं, तर माझ्याशी फारकत घेऊ नका," असं ती जाताना म्हणत होती. साक्ष देताना काहीतरी विसरण्याची शक्यता आहे, असा संदर्भ त्यामागे असावा, असं आम्हाला वाटलं. पण आम्ही तिची मानसिक तयारी करून घेतली. पण सरकारी वकिलांच्या लक्षात खरा प्रकार आला होता. ती सतत बाजूला जाऊन कुणाशीतरी मोबाइलवरून बोलायची. आम्ही वकिलांना सांगितलं, “शंका आली तर सरळ होस्टाइल
डिक्लेअर करून टाका. फार प्रश्न विचारत बसू नका."
मुमताजची साक्ष सुरू झाली. नाव, पत्ता आणि इतर प्राथमिक माहिती विचारणारे प्रश्न झाले. इथे कशासाठी आला होता, या प्रश्नावर तिने 'नातेवाइकांकडे आले होते,' असं उत्तर दिलं. शैलाताई जाधव आणि वर्षाताईंसोबत इथं आला होता का, या प्रश्नावर ती 'नाही' म्हणाली. यांच्यापैकी कुणालाच आपण ओळखत नाही, असं तिनं सांगून टाकलं. हॉस्पिटलमध्ये कशासाठी गेला होता, या प्रश्नाला तिनं 'पोटात दुखत होतं,' असं उत्तर दिलं. सरकारी वकिलांनी हरकत घेतली आणि तिला फितूर जाहीर करून टाकलं. सरकारी वकिलांनी बाहेर येऊन आम्हाला साक्षीदार फितूर झाल्याचं सांगितलं. आम्ही फार चिडचीड न करता परिस्थिती स्वीकारली आणि वकिलांच्या केबिनमध्ये गेलो. पाच महिन्यांचा गर्भ असल्यापासून प्रसूतीपर्यंतचा कालावधी रेकॉर्डवर आणावा, असा निर्णय झाला आणि त्यानुसार प्रश्न विचारले. मुलगी झाल्याचं मुमताजनं मान्य केलं. तिची जन्मतारीखही सांगितली.