आला. “पैसे घ्या; पण ओळखत नाही असं सांगा," असा जबाब देण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला जात होता. मग मी पोलिस ठाण्यात फोन करा, असं सिव्हिल सर्जनना सांगितलं. त्यांनी फोन लावला. पोलिस तिथं पोहोचले. पत्रकार ‘एफआयआर' होणार का, असं विचारू लागले. मग मी पत्रकारांना तसं होऊ शकत नाही, असं सांगून कायदेशीर बाबी समजून सांगितल्या. ही तक्रार पोलिसांकडून नव्हे तर सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दाखल केली जाते. पत्रकारांना तोपर्यंत ही बाब विचित्रच वाटत होती. पालिकेचे दोन वैद्यकीय अधिकारी तक्रार नोंदवायला आले. हे अधिकारीही मला ओळखत होते. तेवढ्यात डॉक्टरांच्या लैंडलाइंडवर प्रत्यक्ष मंत्रीमहोदयांचाच फोन आला. ते सिव्हिल सर्जनशी बोलले, माझ्याशी बोलले. 'अशा स्थितीत काय करता येईल,' असं मंत्रीमहोदयांनी मला विचारलं. मी म्हटलं, "आता फक्त कारवाई करता येईल. बाकी काही नाही." मंत्रीमहोदयही मला व्यक्तिशः ओळखत होते. डॉक्टरांच्या वतीनं शब्द वगैरे टाकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. मग मात्र डॉक्टरांना कळून चुकलं... आपली धडगत नाही!
दरम्यान, आमच्या पेशंटला जेव्हा अॅडमिट केलं होतं, त्यानंतर डॉक्टर पुन्हा एकदा कुत्र्याला फिरवायला घेऊन गेले होते. आम्ही दिलेले दोन हजार रुपये त्यांनी शर्टच्या खिशात ठेवल्याचं कार्यकत्यांनी बघितलं होतं. त्या नोटा हजर करा, असं सांगितल्यावर डॉक्टरांनी ते पैसे आणून समोर ठेवले. नोटा बाजूला काढून लखोट्यात घालायला मी सांगितलं. बाकी कुणाचा हात त्या नोटांना लागायला नको. नोटांवरचे नंबर आणि अॅफिडेव्हिटवरचे नंबर जुळवण्याचं काम सुरू असतानाच डॉक्टरांनी कुणाला काही कळायच्या आत नोटा फाडल्या आणि तोंडात टाकल्या नंतर टेबलवरच्या तांब्यातलं पाणी ते घटाघटा प्यायले. नोटा हा महत्त्वाचा पुरावा. तो नष्ट होत असल्याचं पाहून शैलाताई मोठमोठ्यांदा ओरडू लागल्या. मी डॉक्टरांचं बखोटं पकडून आतल्या बाजूला असलेल्या बेसिनजवळ नेलं आणि त्यांच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली. तशा डॉक्टरांनी तोंडातल्या नोटा बेसिनमध्ये टाकल्या. मी त्या नॅपकीननं उचलायला सांगितल्या. पेपरवर ठेवल्या आणि पंखा सुरू करून त्या वाळवल्या. मग सील करून, सह्या करून पुराव्याचं पाकीट तयार केलं. डॉक्टरला थोबाडीत बसल्या क्षणापासून सगळे अचानक स्तब्ध झाले होते. सगळे सरळ वाग लागले होते. नंतर आम्ही पत्रकारांना