अधिकारी येईपर्यंत टाइमपास करणं कार्यकत्यांना भाग होतं. फक्त कोणतंही इंजेक्शन घ्यायचं नाही, अशा सूचना आम्ही पेशंटला नेहमी द्यायचो. कैलास बाहेर उभा राहत असे. कोणीही एकमेकांना अशा वेळी ओळख देत नाहीत. डॉक्टरांनी पेशंटचं ब्लड आणि युरीन तपासून यायला सांगितलं. ते ठिकाण शेजारच्याच गल्लीत होतं. ब्लड-युरीनचे रिपोर्ट हादेखील अशा केसमध्ये पुरावा असतो. तपासणीसाठी जाता-येता कैलासनं मला माहिती दिली. मी सिव्हिल सर्जनच्या केबिनमध्ये गेले आणि 'आमच्यासोबत चला,' म्हणाले. "स्टिंग ऑपरेशन कुठं केलंय," हा सिव्हिल सर्जनचा पहिला प्रश्न होता. 'राजारामपुरीत' असं उत्तर देऊन मी त्यांना सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
हॉस्पिटलमध्येच थांबले होते. पोटात मुलगी असल्यामुळं अॅडमिट झालेले इतरही पेशंट हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टर आल्यानंतर सिव्हिल सर्जनना घेऊन मी त्यांच्या केबिनमध्ये गेले. सोबत त्यांचा शिपाई आणि शैलाताईही होत्या. तोपर्यंत बाहेर कैलासनं कॉइनबॉक्सवरून फोन करून पत्रकारांना बोलावून घेतलं. दहाव्या मिनिटाला पंधरा-वीस पत्रकार तिथं पोहोचले. डॉक्टरांनी सुरुवातीला गर्भलिंगचिकित्सा केल्याचं नाकारलं. समोरच्या कुणालाही आपण ओळखत नाही, असं म्हणाले. तोपर्यंत डॉक्टरांच्या सूनबाईंनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेल्या पेशंट्सना पळवून लावायला सुरुवात केली होती. डॉक्टरांची बायको आणि सासरेही आले. सगळेजण केबिनमध्ये येऊन पाया पडू लागले. पण दुसरीकडे डॉक्टरांनी आधीच 'माणसं' सांगून ठेवली होती, तीही हॉस्पिटलमध्ये आली. त्यातला एक पैलवान केबिनमध्ये आला. योगायोगानं तो मला ओळखणारा निघाला. म्हणाला, "ताई, तुमचं काम एकदम कायद्यानुसार असतंय. हा आमचाच एरिया आहे. पण आम्हीही तत्त्वं पाळणारी माणसं आहोत. बाईमाणसांना त्रास देणार नाही आम्ही. चालू द्या तुमचं. सगळं कायदेशीरच असणार."
डॉक्टरांचा सासरा पाया पडून रडतच राहिला. शेवटी शैलाताईंनी मुमताज आणि माया पवार यांना गाडीत बसवलं. तेवढ्यात जमीर धावत