टीमला सांगितलं, “प्रत्यक्ष मीटिंगच घेऊ. तुम्हाला हवं ते चित्रीकरण करून घ्या." स्टींगच्या निमित्तानं कोल्हापूरला गेले, तेव्हा तिथल्या महिला- बालसंगोपन अधिकारी भेटल्या. मीटिंगनंतर तिनं नेमक्या त्याच' डॉक्टरांबद्दल काही संशयास्पद माहिती असल्याचं सांगितलं. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दिवसाला ५६-५६ गर्भपात झाल्याच्या नोंदी दिसत होत्या. रेकॉर्ड व्यवस्थित असलं आणि गर्भपात आपोआप झालेत असं नोंदवलं जात असलं, तरी संशय आहे, असं महिला-बालसंगोपन अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारण संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी पाहता, गर्भपातांचा आकडा खूपच मोठा वाटत होता. त्या हॉस्पिटलचं रेकॉर्ड आम्ही तपासलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही पुन्हा गेलो. ज्या बायकांची 'मिस्ड अॅबॉर्शन' म्हणजे आपोआप झालेले गर्भपात दाखवले होते, त्या बायकांची माहिती घेतली असता, त्यातल्या बहुसंख्य बायकांना आधीच्या दोन-तीन मुली असल्याचं दिसून आलं. सगळं संशयास्पद होतं. मग आम्ही मोहीम आखण्याचा निर्णय घेतला आणि गर्भवतीचा शोध सुरू केला.
एड्सविषयी ट्रकचालक आणि क्लिनर यांच्यात जागरूकता निर्माण करण्याच्या मोहिमेत आमच्यासोबत जमीर सय्यद काम करत होता. दारूबंदीसह अनेक चळवळींमध्ये आमच्यासोबत असायचा. त्याची बायको मुमताज गर्भवती होती. जमीर तयार झाला; पण घरी सांगावं लागेल, असं म्हणाला. मी त्याच्या घरी गेले. त्याच्या वडिलांचं चिकन सेंटर होतं. आमच्यासाठी त्यांनी चिकनचा बेत केला होता. मी जमीरच्या वडिलांना म्हटलं, “मुलींना वाचवायचं काम आम्ही करतोय. जमीर आणि मुमताजला आमच्यासोबत द्या." त्यांनी परवानगी दिली. आम्हाला अत्यंत प्रामाणिक आणि मुख्य म्हणजे कोर्टात टिकेल अशी साक्षीदार मिळाली. दोन दिवसांनंतर जायचं ठरवलं. बाकी तयारी सुरू होती. गुन्हेगार ज्याप्रमाणं गुन्ह्यापूर्वी रेकी करतात, त्याप्रमाणंच आम्हाला तयारी करावी लागायची. ज्या भागात जायचंय तिथली भाषा, परिसर, पोलिस स्टेशन किती अंतरावर आहे, गावात कुणी ओळखीचे, पाहुणे वगैरे आहेत का, त्या गावातली अडनावं, पेहराव हे सगळं माहीत करून घ्यावं लागायचं. तरच आपण आसपासच्या जिल्ह्यातून आलोय, असं सांगू शकतो. डॉक्टर मंडळी अशा वेळी खूप चौकशी करतात. कुणामार्फत आलात, असं विचारतात. त्यामुळं त्यांच्या संपर्कात असलेल्या डॉक्टरांची नावं शोधायला लागायची. शिवाय, इतर तयारीमध्ये सोनोग्राफी मशीन गुंडाळून