पक्षाचे ज्येष्ठ नेते तातडीनं पाटण्याला रवाना झाले होते. त्यावेळच्या महिला आरोग्यमंत्री स्थानिक युवा नेत्याच्या प्रतिस्पर्धी पक्षातल्या होत्या. त्यामुळं त्यांच्याकडून 'सुपारी घेऊन आम्ही हे सगळं करीत आहोत आणि बीड शहराची त्यामुळं नाहक बदनामी होत आहे, असा सूर युवा नेत्यानं लावला होता.
दरम्यान, तत्कालीन गृहमंत्र्यांना मी फोनवरून घटनेची माहिती दिली होती. त्यांनी सूत्रं हलवली आणि पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक असे वरिष्ठ अधिकारी तिथं दाखल झाले. युवा नेत्याला आमच्या ताकदीचा अंदाज आला. तरीही आम्ही काहीही गैर करत नाही आहोत, जे करतो आहोत ते आवश्यक आणि कायदेशीरच आहे, हे त्याला समजावणं आवश्यक वाटलं. मी म्हटलं, “नेते, या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरं होतायत. त्यामुळं लोकसभेचा एक आणि विधानसभेचे तीन मतदारसंघ कमी झालेत. आता मुलींची संख्या घटत चाललीय. एक हजार मुलांमागे साडेसहाशे मुली, एवढंच आजचं प्रमाण आहे. हे असंच राहिलं, तर पुढं लोकसंख्येचा समतोल कसा राहील? जिल्ह्यातले मतदारसंघ असेच
कमी होत गेले तर तुमचं राजकीय भवितव्य काय? खरं तर तुम्ही आम्हाला थक्स म्हणायला हवं. बघा पटतंय का!"
थेट राजकारणाशी जोडलेला हा मुद्दा युवा नेत्याला चटकन समजला; भिडला. शिवाय, “मी दारूचे धंदे उधळून आलेली बाई आहे. मला धमक्या देऊ नका," हेही सांगितल्यामुळं आणि पोलिस अधिकारीही आमच्यासाठीच तिथं आलेले असल्यामुळं त्याचा पारा उतरला होता. शेवटी कारवाईचं कामकाज पूर्ण झालेवर आम्ही सगळे त्याच्याबरोबरच खाली आलो. “या ताईला काही करायचं नाही. जाऊद्या ताईला," असं त्यानं जमलेल्या तरुणांना सांगितलं. आमच्याच गाडीच्या बॉनेटवर उभा राहिला आणि चक्क भाषण वगैरेही केलं. मग पुढे-मागं पोलिसांच्या गाड्या देऊन स्थानिक प्रशासनानं आम्हाला बीड जिल्ह्याच्या सीमेपर्यंत बंदोबस्तात सोडलं. पण हे सीमोल्लंघन तात्पुरतं ठरणार, हे त्यावेळी आम्हाला कुठं माहीत होतं! बीड जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर पडल्यावर पुन्हा या भागात येणंही होणार