Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कसं आणि कुठे पाठवलं, हे आम्हाला कळलंसुद्धा नाही. डॉक्टर पळून गेल्याचं कळल्यावर 'आता काय करणार,' असा प्रश्न पत्रकार आम्हाला विचारू लागले.

 सोनोग्राफी मशीन सील करण्यासाठी बेडशीट, लाख, मेणबत्ती, काडेपेटी असं साहित्य अशा वेळी आमच्यासोबत असतंच. सिव्हिल सर्जननी मशीन सील करायला सांगितलं आणि डॉक्टर बेपत्ता झालेत असं पत्रकारांना सांगितलं दवाखान्यातल्या फायली, रेकॉर्ड सगळं जप्त केलं आणि आम्ही सगळे पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल सर्जनच्या कक्षात आलो. दरम्यान, ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि शहरातले सगळे दवाखाने धडाधड बंद झाले. संपूर्ण शहरात तब्बल ऐंशी सोनोग्राफी सेंटर होती, ती सगळी बंद झाल्याचं कळलं. इकडे मीडियाला कारवाईची माहिती मिळालेली. त्यामुळं पुढची स्टिंग ऑपरेशन करणं अशक्य झालं होतं. उरलेल्या सात अपॉइन्टमेन्ट्स वाया जाणार असल्या, तरी एक समाधान होतं की, इतकं उघडउघड आपण यापुढं करू शकणार नाही, कधीतरी आपल्याला अडकावं लागेल, कुणीतरी मुली वाचवायचं काम करतंय, हे शहरातल्या डॉक्टर मंडळींना कळून चुकलं होतं.

 चांगल्या कामांसाठी लोकांचा पाठिंबा मिळवणं किती अवघड असतं! परंतु गैरकृत्यं करणारे आपल्या मागे कशी फौज उभी करू शकतात, हे त्या दिवशी आम्हाला समजलं. आम्ही सिव्हिल सर्जनच्या केबिनमध्ये असतानाच सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर अचानक अडीचशे ते तीनशे तरुण जमा झाले. आमच्या ट्रॅक्सला त्यांनी दुचाक्या आडव्या लावल्या होत्या. एका स्थानिक देवस्थानशी संबंधित ती 'सेना' होती आणि स्थानिक युवा नेता या जमावाचं नेतृत्व करत होता. कारवाई झालेले डॉक्टरसुद्धा या देवस्थानशी संबंधित असल्याचं समजलं. काही वेळानं तो युवा नेता सिव्हिल सर्जनच्या कक्षात आला आणि आम्हाला अद्वा-तद्वा बोलू लागला. आमच्यासारख्या बाहेरच्या मंडळींनी बीडमध्ये येऊन असं काही करणं त्याला बरंच झोंबलेलं होतं. नेमक्या त्याच वेळी लालूप्रसाद यादवांना अटक झाल्यामुळं बिहारमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधारी

३३