Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रेडिओलॉजिस्टनाच त्यांनी बोलावून घेतल होतं. पुन्हा सोनोग्राफी झाली. 'मुलगाच आहे,' यावर त्यांचंही शिक्कामोर्तब झालं. निम्मं काम झालं होतं. आता कारवाईसाठी सिव्हिल सर्जनना बोलवायचं आणि हे सगळं गोपनीयरीत्या करून उरलेल्या सात अपॉइन्टमेन्ट्स आजच पूर्ण करायच्या, असं आमच्या मनात होतं.

 सिव्हिल सर्जनच्या घरीही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सुरू होती. आम्ही सगळे आरतीला उभे राहिलो. त्यानंतर त्यांना आमची ओळख सांगून घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा 'कसला रे बाबा विघ्नहर्ता!' असं म्हणून कपाळावर आठ्या घेऊन ते आमच्यासोबत निघाले. दरम्यान, तोपर्यंत पत्रकारांना या प्रकरणाचा कसा सुगावा लागला कुणास ठाऊक! एकेक करून तब्बल साठ पत्रकार डॉक्टरांच्या दवाखान्यात जमले. खरं तर आठही स्टिंग ऑपरेशन एकाच दिवशी करून मीडियाला एकदम माहिती द्यायची असं आमचं ठरलं होतं. आम्ही सिव्हिल सर्जनना घेऊन डॉक्टरांच्या दवाखान्यात पोचलो तोपर्यंत डॉक्टर दवाखान्यातून पुन्हा घरात गेले होते. पण प्रसूतीसाठी एक महिला अॅडमिट होती आणि ती कळाही देऊ लागली होती, म्हणून डॉक्टर पुन्हा दवाखान्यात आले. त्या महिलेची प्रसूती झाल्यानंतर कारवाईस सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन ते प्रसूती करण्यासाठी आत गेले.

 इकडे बाहेरच्या कक्षात पत्रकारांनी आमच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली होती. फोटो काढणं, शूटिंग वगैरे सुरू केलं होतं. या सगळ्या गदारोळात आम्ही डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघत होतो. पंधरा मिनिटांनी मी कानोसा घेतला, तेव्हा पेशंट महिलेच्या कळांचे आवाज येईनासे झाले होते. आतून कुठलाच आवाज येत नव्हता. संशय आला म्हणून आम्ही आत गेलो, तेव्हा तिथं कुणीच नव्हतं. खिडकीतून आम्ही बघितलं, तेव्हा जवळच्या मैदानातून डॉक्टर पळताना दिसले... बनियन-हाफ पँटवरच! अशा प्रकारचा अनुभव आम्हाला पहिल्यांदाच येत होता. रंगेहाथ पकडल्यानंतर डॉक्टर मंडळी बहाणे सांगतात, आम्हाला ओळखायलाही नकार देतात, आपण असं काही केलंच नाही असं सांगू पाहतात, इथपर्यंतचे प्रकार आम्ही पाहिले होते. परंतु हे डॉक्टर तर चक्क खिडकीतून पळून गेले होते. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दरम्यानच्या काळात त्यांनी कुठून,

३२