Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ती तिची मैत्रिण असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. निर्धास्त झाल्यावर डॉक्टरांनी उरलेल्या पैशाची मागणी केली. तीनहात नाक्यावर ठाणे मनपाचे आरोग्य अधिकाऱ्यांना पैसे घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते आले होते. ठरल्याप्रमोण १०००० आणि नंतर ५०००० जमा करायचे होते. थोडी काळजी वाटत होती. साठ हजाराचा हिशोब कसा लागणार, दिलेले सगळे पैसे मिळाले पाहिजे.कैलासनं डॉक्टरांना ५०००० दिले. नंबर आमच्याकडे नोटांचे नंबर आमच्याकडे नोंदविले होते. पैसे मिळाल्यावर डॉक्टरांनी ड्रॉवर उघडला गाडीची चावी घेतली आणि चला म्हणाले. कैलासला सोबत घेतलंच नाही. त्यामुळे शर्वरी थोडी घाबरली. तिला कैलासनं समजून सांगितलं. काळजी करु नकोस. डॉक्टर सोबतच आहेत. डॉक्टराचे काहीतरी विसरल्यामुळे ते पुन्हा केबिनमध्ये गेले तेवढ्यात मी खाली उभी आहे आणि त्याच्या मागेच आहे असं कैलासने शर्वरीला सांगितले दरम्यान कोणतही इंजेक्शन किंवा औषध घेऊ नको.असं तिला आधीच बजावलं होतं. डॉक्टर बाहेर आले आणि शर्वरीला घेऊन लिफ्टमधून खाली उतरले. कैलासनं त्यांना चहा घेऊन येतो, असं सांगितलं. ते खाली उतरले तेवढ्यात कैलासने मला फोन लावला." ते दोघेही खाली उतरत आहेत. डॉक्टर त्यांच्या गाडीतून तिला घेऊन जात आहेत" असे त्यांन सांगितलं ते कुठे नेतात हे कैलासला माहित नव्हते. आम्ही खाली गाडी स्टार्ट करुन तयार राहिलो. डॉक्टरांनी शर्वरीला गाडीत बसवलं. आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत होतो. सुरक्षति अंतर ठेवून आम्ही त्याच्या मागे-मागे होता. अर्धा तास गेल्यानंतर एका अपार्टमेंटजवळ गाडी थांबवली अपार्टमेंटच्या खाली काही गाळे होते. एका गाळ्यावर सोनोग्राफी सेंटर असा बोर्ड होता. शर्वरीला घेऊन डॉक्टर तिथं गेले. आमची गाडी आम्ही लांब थांबवली. कारण स्टिंग ऑपरेशन अजून पूर्ण झाले नव्हते. जवळजवळ एक तास शर्वरी आणि डॉक्टर दोघेही सोनोग्राफी सेंटरमध्ये होते. मी मायाला चक्कर मारुन यायला सांगितलं. माया आणि शैला दोघी सोनोग्राफी सेंटरमध्ये गेल्या. आत त्यांना बरीच गर्दी दिसली. डॉक्टर आणि शर्वरी दोघेही दिसत नव्हते यांचा अर्थ ते सोनोग्राफीसाठी आत गेले होते. इथल्या कंपाऊंडरनी शैलाला विचारलं काय करायचंय? कोणाकड़े आलात? कोणाला भेटायचं? आमचा पेशंट येणार होता, म्हणून आलो" असं शैलाताईंनी त्यांना सांगितलं त्या दोघी खाली उतरल्या. दहाच मिनिटांत डॉक्टर शर्वरीला घेऊन खली आले. पुन्हा गाडी बसले आणि गाडी परत तीन नाक्याकडे धावू लागली. आम्ही त्याच्या पाठीमागे होतो. डॉक्टर शर्वरीला घेऊन पुन्हा त्यांच्या दवाखान्यात आले. गाडी पार्क करुन पुन्हा लिफ्टने जाऊन त्यांच्या केबिनमध्ये गेले.

२६