म्हणून त्याला सोबत बसवलं होतं. दुसरी एक गाडी आमच्या पाठीमागे उभी होती. त्यामध्ये शैलाताई आणि मायाताई अशा दोघी बसल्या होत्या. कैलास आणि शर्वरी स्टिंगला गेले तेव्हा मी आणि शैलाताईंनी ठाण्यातील सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करायला सुरुवात केली.
रविवार दिवस असल्यामुळं कोणताही अधिकारी सापडत नव्हता. तरीसुध्दा वरपर्यंत अधिकाऱ्यांना कल्पना देऊन काही अधिकारी पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार मनपा आरोग्य अधिकारी आले. तिकडे कैलास, शर्वरी आणि ती पत्रकार मैत्रीण बसून राहिले. शर्वरीने पंजाबी ड्रेस घातला होता. ड्रेसच्या आत तिने मी दिलेला मोबाईल रेकॉर्ड ओन करून ठेवला होता. कैलासने कॅमेरा ऑन केला होता. पत्रकार मैत्रिणीने तिच्या डायरीमध्ये एक कॅमेरा आणला होता. कैलासने तिला कॅमेरा सावधपणे वापरायला सांगितलं. कारण डॉक्टरच्या थोडंजरी लक्षात आलं असतं तरी सगळं काम फिसकटलं असतं. ती कैलासला
म्हणाली, “ मला सवय आहे. मी आधी भरपूर जणांचे स्टिंग केलं आहे." कैलास तिला म्हणाला," या स्टिंगमध्ये आणि इतर स्टिंगमध्ये फरक आहे. यामध्ये थोडी जरी गडबड झाली. डॉक्टरला शंका आली तरी काम फिसकटेल. त्यामुळे रिस्क नको." पण ती काही ऐकत नव्हती. तेव्हा कैलास तयार झाला.
तिथे त्या बाकड्यावर एक बाई तिच्या गरोबर मुलीला घेऊन बसली होती. तिच्यासोबत आणखी एक बाई आलेली होती. कैलासने हॉस्पिटलवर नजर टाकली. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. कैलासने शर्वरीला हळूच सांगितलं, की आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे कोणतीही गडबड करायची नाही. शांतपणे जे चाललंय ते चालू द्यायचं. थोडया वेळांनं डॉक्टर केबिनच्या बाहेर आले. त्यांनी तिघांकडे पाहिलं. आपण फोन केला होता. याची आठवण कैलासने त्यांना करुन दिली. डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितलं आणि बाकडावर बसलेल्या त्या महिलांना बाजला घेऊन गेलं. त्यांच्याशी ते गर्भपात करण्याविषयी बोलत होते. गरोगर मुलीचं वय लहान असल्याचं दिसत होतं. तिचं एका मुलावर प्रेम होते पण घरच्यांना ते मान्य नव्हतं. तिचं पोट खाली करायचं होतं. त्या दोघींसोबत आणखी एक बाई होती. ती ते बाळ जन्माला आल्यावर, ज्यांना बाळ नाही त्यांना डॉक्टरांच्या मदतीनं विकणार होती. या सगळ्या चर्चा कैलास ऐकत होता. हा डॉक्टर दिसतो तेवढा साधा नाही. त्या बाईची एक संस्था मुंबईतपासून जवळच काम करत होती. डॉक्टरांनी त्या गरोदर महिला व तिच्या आईला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि घरी पाठवलं.