चॅनेलच्या मुंबईतल्या पत्रकार मैत्रिणींन स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्ती केली. मला स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी व्हायचं आहे. माझ्याकडे माहिती आहे एका डॉक्टरची. साकीनाकामध्ये आहे तो डॉक्टर . बिनधास्त गर्भलिंगनिदान करतो आणि मुलगी असल्यास गर्भपातसुध्दा करतो. गर्भपात केलेले भ्रूणांचे फोटो मला दाखवले आहेत. आपण हे लवकरात लवकर थांबवायला पहिजे," तिच्याशी मी याआधीही बोलले होते. तशी ती खूप
धडपडी होती, पण ती चॅनेलची प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार की वैयक्तिकरीत्या, हे स्पष्ट नव्हते. स्पष्टता यासाठी हवी की, स्टिंग झाल्यानंतर उद्या कोर्टात केस उभी राहीली, की साक्षीदार म्हणून पिंजऱ्यात उभं रहावं लागणार. केवळ डॉक्टरला पकडणंच महत्त्वाचं नाही. तर साक्षीपुरावे होऊन कोर्टात शिक्षा लागणं त्याहून महत्त्वाचं असतं. मी तिला तिची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. तिने तिच्या चॅनलच्या बॉसशी मला बोलण्यास सांगितलं.
त्यानुसार, मी तिच्या बॉसशी बोलले. त्यांनी सहभागी होण्याची संमती मैत्रिणीला दिली. म्हणाले" वर्षाताई, तुम्ही असल्यानंतर मला कसलीच काळजी नाही. किमान चांगलं काम एकत्रित केल्याचं समाधान तरी मिळंल. माझी काही हरकत नाही. चला, एका काम तर झालं. मी तिला त्या डॉक्टरची भेटायची वेळ घेऊन ठेवायला सांगितलं. मी गरोदर महिला शोधून ठेवते. पण डॉक्टरची सगळी माहिती, वेळ सगळं पध्दतशीर झालं पाहिजे. बाकी संगळं माझ्यावर सोडून चला लागा कामाला असं मी सांगितलं.
मी एक-एक फोन केले. कार्यकत्यांना विचारलं. कोणी गरोदर महिला असेल तर कळवायला सांगितलं. सगळीकड़े निरोप दिले. कारण खात्रीशीर गरोदर महिला मिळणं महत्त्वाचे. उद्या डॉक्टरला पकडल्यानंतर कोर्टात साक्षीला उभं राहावं लागेल. ती महिला स्टार विटनेस असेल. कोर्टात ती टिकली पाहिजे. तरच केस मजबूत होते. नाहीतर डॉक्टरची निर्दोष मुक्तता ठरलेली. पुन्हा कोर्टात केस उभी राहिल्यानंतर तारखा पडतात. या प्रक्रियेत दोन तीन वर्ष जातात. तोपर्यंत साक्षीदार सांभाळणं, गरोदर महिलेची काळजी घेणं, तिची प्रसूती सुखरूप होईल हे बघणं, बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्मतारखेचा दाखला कोर्टात सादर करणं, खूप गुंतागुंत असते. या सगळ्या प्रक्रियेत गरोदर महिला ठाम राहिली पाहिजे. अशी कोण मिळेल ? शैलाताई म्हणाल्या, " रविकांतची बायको शर्वरी गरोदर आहे ना ? विचारा बर तिला ! मी लगेच फोन लावला. तिला बरोबर चौथा महिना होता. मी तिला विचारलं आणि रविकांतलाही सांगितलं. दोघेही आनंदानं तयार झाले. पण बुलढाणा ते मुंबई आणि पुन्हा बुलढाणा हा सगळा प्रवास कसा झेपणार असा प्रश्न त्याला पडला.