पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/१७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याचा अंदाज येईना. परक्या गावात नवीन जागी झोपही लागेना. उजाडायची वाट बघत पडून राहिले. कोण असेल डॉक्टर ? किती मुली याआधी मारल्या असतील त्यानं ? माझ्या हातूनच त्याचं कल्याण होणार असं दिसतंय .. पहाटे कधीतरी झोप लागली. आठ वाजता गजर झाला तेव्हाच जाग आली. आवरुन कैलासला फोन करायला सांगितलं. यावेळी त्या भाईने दुसऱ्या रिंगला फोन उचलला आणि बरोबर दहा वाजता नंदूरबार एसटी स्टॅण्डवर यायला सांगितलं. मी सरकारी डॉक्टरांना फोन केला आणि दहा वाजता त्या ताईला सोबत घेऊन स्टॅण्ड परिसरात यायला सांगितलं.

 ठरल्याप्रमाणे पावणेदहाला स्टॅण्डवर दोघं उतरले. पुढचं काहीही नियोजन माहित नव्हतं. परंतु आम्ही गाफील अजिबात नव्हतो. सोबत महाराष्ट्र शासनाची गाडी होती. एक व्हिडिओ शूटींगवाला कॅमेरा घेऊन सोबत घेतला. कैलासने त्याच्यासोबत छुपे कॅमेरे घेतले होते. दहा वाजले तरी भाईचा पत्ता नाही ! दोघे स्टॅण्डवर थांबले होते. साडेदहा वाजले तरी भाई येईना. आता मला काळजी वाढू लागली. भाई बहुतेक गायब झाला, असं वाटू लागलं. मी कैलासला फोन केला आणि सांगितलं, “भाईला फोन कर," तेवढ्यात भाई दिसला आणि मी फोन कट केला. भाई कैलासजवळ आला आणि समोरच एका एसटीमध्ये बसायला सांगितलं. एसटी महामंडळाचा लाल डबा ! ते तिघं एसटीमध्ये चढल्याचं आम्ही पाहिलं. पण ते कुठं निघालेत, हे कळेना. एसटीचा बोर्ड लांबून वाचता येईना. फोन करावा तर गडबड होणार !

 मी आमच्या शासनाच्या गाडीच्या ड्रायव्हरला सांगितलं की, काही झालं तरी त्या एसटीच्या मागे-मागे गाडी चालवायची. पण संशय येता कामा नये. थोडं अंतर ठेवून गाडी चालवायची.. हे सांगत असेपर्यंत एसटी सुटली. कैलासचा मेसेज आला. सुरत ! एसटीचा वेग बेताचा होता. त्यामुळं कधीकधी नाईलाजाने आम्हाला तिला ओवरटेक करावं लागत होते. खिउकीत बसलेला कैलास आम्हाला दिसत होता. तोही बघून न बघितल्यासारखं करायचा. एसटीमध्ये कैलासने भाईशी गप्पा सुरु केल्या आणि त्याचा विश्वास संपादन करुन लागला. एसटीचा कंडक्टर आला. त्याने तिकीट विचारलं. कैलास तिघांचं सुरतपर्यंत तिकीट काढलं. पुरावा म्हणून तिकिटाचाही उपयोग होणार होत. जवळजवळ साडेतीन तास एसटीचा प्रवास सुरु होता. सोबतच्या ताईला भाई सतत प्रश्न विचारत होता. नवरा काय करतो, तू काय करतेस... असे तो विचारायला लागला. मग कैलास मध्येच म्हणायचा, “भाई काम व्हायला पाहिजे. प्लीज बघा कर का." भाईही लगेच म्हणायचा, " अरे फिकीर नको

१३