गमतीनं म्हणायचे, आपण फायर ब्रिगेड किंवा एअर इंडियावाले वाटतो. सतत तयार. सतत ऑन ड्युटी ! गाडी सुरु झाली आणि सातारा ते नंदुरबार प्रवास सुरु झाला.
सकाळी साधारण आठच्या दरम्यान नंदूरबारमध्ये पोहाचलो. जवळजवळ चौदा तास प्रवास झाला होता. विश्रांतीची गरज होती. आरोग्य विभागानं आमची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली होती. आम्ही पोहोचल्याबरोबर आरोग्य विभागची गाडी आम्हाला रिसीव्ह करायला आली. सकाळी अकरा वाचता कार्यक्रम होता. आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. ग्रामीण भागातून महिला येणार, तेही घरातली काम आवरुन. म्हणजे थोडावेळ इकडे-तिकडे होणार हे गृहितच होते. बारा वाजता कार्यक्रम सुरु झाला. कैलास फोटो काढण्यासाठी समोर प्रेक्षकांमध्ये होता. सगळ्यांची भाषणं झाली. प्रमुख पाहुणी म्हणून माझं भाषण ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. माझं भाषण सुरु झालं. महिलांवर त्याचा प्रभाव दिसू लागला. टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला, थोडंसं हसू, कधी डोळ्यात पाणी तर कधी बाई म्हणून अभिमान वाटावा अशा शब्दांनी भाषण रंगत गेलं. मी शेवटी असं सांगितलं की, मुलगी वाचवण्याचा प्रश्न जरी आदिवासी भागात नसला तरी शेजारच्या जिल्ह्यात हा प्रश्न असल्यास त्याचा परिणाम आकडवारीत दिसतो. कारण आपल्या भागातील म्हणजेच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी सोडून ज्यांना मुली नको अशी मानसिकता आहे ते नंदुरबारमधून शेजारच्या जिल्ह्यात जाऊन गर्भलिंगनिदान करु शकतात. मुलगी असल्यास ते आपल्या जिल्ह्यात गर्भपात करु शकतो. म्हणजे तपासणी शेजारच्या जिल्ह्यात आणि गर्भपात आपल्या जिल्ह्यात. असं होत असेल. तरी आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. या वाक्यानंतर जोरदार टाळ्या पडल्या. यावरुन मला थोडा अंदाज आला. काहीतरी गडबड आहे दिसत होतं. सरकारी यंत्रणाही थोडी गाफिल असणार. कारण आमच्याकडे असं काही होतच नाही. अशी भूमिका घेतली की प्रश्नच उरत नाही. मग सरकारकडून आलेले पैसे पोस्टर, बॅनर, पथनाट्य आणि कार्यशाळा यात खर्ची पडतात. पण मी शांत बसणारी आणि भाषण करुन निघून जाणारी बाई नव्हते आणि भाषण करुन जावयांचा छान-छान म्हणणं माझ्या स्वभावात नव्हतं. म्हणून जमलेल्या सर्व महिलांना आईची शपथ घातली. " आई नसती तर आपण जन्माला आलो असतो का ? मग तिच्याप्रती कृतज्ञ राहायचं असेल तर आपण मुली वाचवण्याचा वसा घेतला पाहिजे." असं आवाहन केलं. कार्यक्रमाला आशाताई, अंगणवाडीताई आल्या होत्या.