पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डॉक्टर भरले. उरलेल्या दीडशे डॉक्टरांची स्वतंत्र यादी आम्ही तयार केली. दरम्यान, वेगवेगळ्या मार्गानं आम्ही माहिती गोळा करीत होतो. समस्या किती खोल आहे, याचा अंदाज हळूहळू येत होता. वैद्यकीय कचऱ्याच्या (बायोमेडिकल वेस्ट) कायद्याची त्यावेळी प्रभावी अंमलबजावणी होत नसे. ज्या गर्भपात केंद्राच्या आसपास उकीरड्यावर कुत्री-डुकरे जास्त प्रमाणात कशावर तरी तुटून पडलेली दिसतात, त्या केंद्रांची नोंद आम्ही ठेवली. वेगवेगळ्या मार्गानं मिळत असलेली माहिती 'त्या' दीडशे केंद्रांशी पडताळून पाहिली असता कुठे पाणी मुरतंय याची कल्पना आली. आणि त्याच काळात दुसरी धक्कादायक घटना आमच्याच बाबतीत घडली.

 आमच्या बचत गटातून विविध कारणांसाठी महिलांना कर्ज दिलं जायचं. महिला मंडळात आम्ही गर्भपातासंबंधी माहिती जमवायचा प्रयत्न करीत असतानाच एका महिलेनं दिलेल्या माहितीनं आम्ही दचकलो. मुलगा की मुलगी बघायला दोन हजार रुपये आणि गर्भपाताला दोन हजार रुपये घेणाऱ्या डॉक्टरचं नाव समजलं. पण गर्भपात करून घेणाऱ्या महिलेचं नाव आमच्या दृष्टीनं अधिक धक्कादायक होतं. कारण हे चार हजार रुपये तिनं आमच्याच बचत गटातून कर्जाऊ घेतले होते. या महिलांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तयारी केली आणि पहिलं स्टिंग ऑपरेशन करून सातारचे डॉ. थीटे यांना गर्भलिंगचाचणी करताना पकडलं. त्यावेळी सोनोग्राफी करून देणारा डॉक्टर तर आज साताऱ्यातूनच निघून गेलाय. डॉ. थीटे यांनीही “मलाच एकट्याला पकडलं. इतरांचं काय?" असा सूर लावला. मग त्यांच्याकडूनच नावं घेऊन आम्ही पुढच्या कारवाया केल्या. डॉ. थीटे यांना पकडण्यासाठी केलेलं स्टिंग ऑपरेशन महाराष्ट्रातलं पहिलं आणि देशातलं दुसरं ठरलं. तत्पूर्वी फक्त हरियानातल्या पालवलमध्ये अशा प्रकारची कारवाई झालेली होती. मुली वाचवण्याची आमची धडपड त्या क्षणापासून आजतागायत अव्याहत सुरू आहे. या प्रवासात आमच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा खूप त्रास सहन केलाय. ताणतणाव झेललेत. उपाशी-तापाशी राहून

काम केलंय. त्यांची हिंमत आणि मेहनत लोकांसमोर यावी, म्हणूनच या संपूर्ण प्रवासातले खाचखळगे, चढउतार, वेडीवाकडी वळणं, जय-पराजय उलगडून दाखवावेत, असं वाटलं. माझ्या या प्रयत्नाचं तुम्ही स्वागत कराल, अशी अपेक्षा करते.