पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय पंधरावा


संप व बंदकाम




 १५.०१ कामगार संप का करतात?कुठल्याही उद्योगधंद्याशी,कारखान्याशी संबंध असलेल्या व्यवस्थापकासमोर हा प्रश्न कधी ना कधी येत असतो.मुळात माणसे काम का करतात ? हा प्रश्न मनासमोर यायला हवा,पण आपण त्याचा विचार करत नाही.आपण त्याची जाणीव ठेवत नाही.जोपर्यंत माझा पाय,हात,पाठ,मान,दुखत नाही तोवर मला पाय,हात,पाठ,मान आहे याची स्पष्ट जाणीव नसते.त्या त्या अवयवांची कामे चालू असतात तोपर्यंत आपण ती गृहीत धरून चालतो.त्यांची फिकीर करत नाही,पण हे कुठवर? जोपर्यंत सर्व शरीर तंदुरुस्त आहे तोवर.जरा का पायात काटा मोडला,ठणका बसू लागला की आपल्याला लगेच पाय आहे,त्याला बोटे आहेत हे जाणवू लागते.आपले लक्ष तिकडे लागते.जणू काही पायातला काटा हा आपल्या दृष्टीने जगातला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न बनून जातो.दुसरे काही सुचत नाही,समजत नाही.व्यवस्थापनात कामगारांचा संप,त्यांची कुरबूर हा प्रकार असाच असतो.शरीराच्या एका लहानशा भागाचे दुखणे हे साऱ्या शरीराचे,साऱ्या संवेदनांचे केंद्र बनते.

 १५.०२ दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली गोष्ट आहे.जनरल माँटगोमेरीने एका स्वारीच्या सामानाच्या तयारीची यादी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याकडे पाठवली.त्यांत दोन डेंटल खुर्त्यांसाठी मागणी होती.ती पाहून चर्चिल रागावले.त्यांनी माँटगोमेरींना विचारले,की तुमचे सैनिक लढायला जात आहेत,त्यांच्या

८८ सुरवंटाचे फुलपाखरू