पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत व सारे जण त्यांच्यात वाढ करण्याची मागणी करत आहेत.अनुत्पादक लोकांची,वकिलांची एवढी फौज अमेरिका सोडून क्वचितच कुठे असेल! वकील ही अमेरिकेचीसुद्धा मोठीच डोकेदुखी आहे.महाराष्ट्र सरकारची गेल्या काही वर्षांत चालू झालेली तंटामुक्त गावांची आबा पाटलांची योजना शहरी लोकांना माहीतच नाही!
 १४.२० विनोबा भावे यांनी 'आहेरे' आणि 'नाहीरे' या सामाजिक विभागणीला नेटका नकार दिला.शंभर टक्के भारतीय मुशीतून घडलेल्या या अद्वितीय विचारवंताने ही परस्परविरोधी,मूळ दोन वर्षांची द्वैताधारित कल्पनाच नाकारली.प्रत्येक माणूस हा आहेरे असतो.त्याच्याजवळ समाजाला देण्यासारखे काहीना काही असते.तो केवळ घेणारा,लाचार नाही.तो देणाराही आहे.तो स्व-तंत्र असतो.तो केवळ यंत्रातला निर्जीव खिळामोळा नसतो.भारतीय तत्त्वज्ञानाच्या भक्कम अद्वैती पायावर सर्व समाज हा एखाद्या शरीरासारखा आहे.सर्व जीव हे त्याचे घटक किंवा अवयव आहेत.ह्या पायावर त्यांनी त्यांच्या भूदान,ग्रामदान या विचारांची मांडणी केली आणि कोणी कल्पनाही केली नव्हती एवढी म्हणजे पंचेचाळीस लाख एकर जमीन केवळ माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करून विनामूल्य मिळवून दाखवली!त्यांनी हे प्रत्यक्ष घडवून दाखवले.माणूस केवळ आर्थिक पशू नाही,तर संपूर्ण मानव आहे याचा नमुना तयार करून दाखवला.परम साम्य शोधण्याची दिशा दाखवली.त्यानंतर झालेल्या सरकारी कायद्यांनीही एवढी जमीन मिळवता आलेली नाही.

 १४.२१ मी या नव्या भारतीय नजरे'ने १९७२ सालापासून पाहू लागलो.मला इंग्लिश संकल्पनांची झापडे जाणवू लागली.त्यानंतरच्या पंधरा वर्षांत मी फक्त द्विपक्षीय करारांचा आग्रह धरून कोर्टाची पायरी न चढता मालक-मजूर संबंधांची चांगली मालिकाच पंधराशे कामगारांच्या दोन कारखान्यांत राबवू शकलो.माझे विचार प्रत्यक्ष प्रयोगाने तपासून घेतले.त्यासाठी १९६६ सालापासून १९९० सालापर्यंत सतत दर महिन्याला कामगारांशी संपर्क माध्यम म्हणून मासिक पत्रिका चालवली.माझ्या स्वतःच्या विचारात व नंतर आचारात संपूर्ण बदल (ट्रान्स्फॉर्मेशन) झाला आणि घडवलाही.

सुरवंटाचे फुलपाखरू ८७