पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वसामान्य कामगाराला नोकरी हवी असते,उत्पन्नाचे स्थिर साधन हवे असते.त्यात मधुनमधून मिळेल तेवढी वाढ हवी असते.इतर कामगारांपेक्षा जास्त पगार मिळाला तर हवा असतो.बढती हवी असते,पेन्शन,फंड,सुट्टया हव्या असतात.अडीअडचणीला कर्ज हवे असते.मुख्य म्हणजे उत्पन्नाची व नोकरीची शाश्वती हवी असते व त्यासाठी नेता सांगेल ते मानायची त्यांची तयारी असते.संप करायला मात्र तो नाखूष असतो,कारण त्यामुळे त्याच्या स्थिर उत्पन्नावर घाला येतो.नाखुषीने का होईना 'जातीसाठी खावी माती' म्हणून तो संपाला तयार होतो.तो कामगारवर्ग म्हणून एका विचाराचा नसतो.मालक हा शत्रू असा विचार त्याच्या मनात नसतो.त्यातून त्याचा मालकही कोणी मोठी कंपनी असली तर मालक अशी कोणी प्रत्यक्ष व्यक्ती त्याला दिसत नाही.दिसतात ते सारे त्याच्याचसारखे नोकरी करणारे,जास्त पगार मिळवणारे लाभार्थी अधिकारी.त्यांच्याबद्दल व खास करून त्यांना मिळणाऱ्या जास्त पैशांबद्दल त्याला असूया वाटते.मला अधिक पैसे मिळायला हवे,मग भले तुम्ही कितीही मिळवा असा साधा-सोपा विचार त्याच्या मनात असतो.त्याच्या मनात काही वैयक्तिक राग,सूड अपमान जरूर असतात,पण ते कुठल्या एका वर्गाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून असतात.
 १४.१० मला मालक लोकांची एकी,कारखानदारांची एकी अशी कधी दिसली नाही.मालक-मजूर तंट्यात त्यांची एकमेकांना मदत कधी आढळली नाही.प्रत्येक जण एकट्यानेच स्वतःची सोय पाहताना,स्वतःचा फायदा मिळवताना व स्वतःच्या अडचणीची सोडवणूक करताना आढळला.मालक वर्ग म्हणून विचार करताना दिसले नाहीत.सरकारविरुद्ध तक्रारी करतांना,अर्ज-विनंत्या करताना आणि जेव्हा आयात-परवान्यांसारखे घबाड मिळवायचा विषय होता तेव्हा त्यासाठी संघटना होत्या व आहेत,पण त्या तेवढ्यापुरत्या.एरवी,उलट,एकीपेक्षा फाटाफूट आणि भांडणे व चढाओढ जास्त आढळली.

 १४.११ कामगार-मालक या वर्गशत्रूची भांडणे व खेकटी निस्तरण्यासाठी इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स अॅक्ट व इतर कामगार कायदे,कोर्ट,वकील,सल्लागार व अधिकारी यांची प्रचंड संख्या दिसली.सर्व प्रश्न कोर्टात जाऊन सोडवायचे यावर भर दिसला.या सर्व कायद्यांत एक मूलभूत खोटेपणा भरलेला आहे.त्यांची मूळ धारणा ही वर्गकलहाची आहे.पाश्चात्य विचारपद्धतीने होयानाही या तर्कशास्त्राच्या पद्धतीने सर्व प्रश्नांबाबत निर्णय घेण्याची संकल्पना आहे.दोन पक्षांतला एक बरोबर-दुसरा चुकीचा,एक जिंकणार-दुसरा हरणार असे ठरवण्याची अपेक्षा आहे.या कायद्यांच्या आधारावर न्याय करणाऱ्या कोर्टातला

सुरवंटाचे फुलपाखरू ८३