पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवीन तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक उत्पादन करणारा पहिला देश म्हणून ब्रिटन हे अग्रणी राष्ट्र-राज्य होते.अनिबंध व्यापारस्वातंत्र्य व राखीव बाजारपेठ ही त्यांची गरज होती.हुकमी बाजारपेठ साम्राज्यवादाच्या विचारातून खेचून घेतली गेली होती.
 १४.०६ कम्युनिझमचा वा समाजवादाचा विचार हा या प्रकारच्या सामाजिक वास्तवावर आधारलेला विचार आहे.'आहे रे' व 'नाही रे' हे समाजाचे दोन प्रतिस्पर्धी गटांत केलेले विभाजन खरे आहे.जगातले सर्व कामगार एक आहेत,त्यांच्याजवळ गमावण्यासारख्या फक्त बेड्याच आहेत,त्यांचे परस्परांशी वैर नाही.राष्ट्रराज्यांच्या सीमा ह्या भांडवलदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा लुटीसाठी निर्माण केलेल्या आहेत,ही सर्व तर्कप्रणाली मार्क्सच्या ब्रिटनमधल्या एकोणिसाव्या शतकातल्या वास्तवाच्या आकलनावर आधारलेली आहे.
 १४.०७ भारतात १९३० ते १९८० या कालखंडात राजकारणात प्रभावी असणाऱ्या पुढाऱ्यांनी याच विचारप्रणालीच्या आधारावर सर्व कायदे,राजकीय व्यवहार,आर्थिक धोरणे आखून तशा घोषणा केल्या.त्यात आहेरे।नाहीरे,मालकामजूर हे दोन प्रभावी व परस्परविरोधी गट मानण्यात आले आणि त्यांच्या परस्पर व्यवहारात वर्गसंघर्ष गृहीत धरण्यात आला होता.त्यात मजूर हा दुबळा व नाहीरे गटातला आहे.त्यामुळे भारतीय समाजात वर्गसंघर्ष हा अटळ आहे हे उघड होते.मालक-मजूर संबंध हे भांडणांचे,डिस्प्यूट्सचे,असणार हेही सहजच मानण्यात आले.वर्गयुद्धाच्या वल्गनाही करण्यात आल्या.
 १४.०८ मी ज्यावेळी एका कंपनीचा व्यवस्थापक म्हणून काम करू लागलो त्यावेळपासून (१९६४) १९८० सालापर्यंत कामगार-मजूर संबंधातले एकामागून एक असे जे कायदे करण्यात आले,ज्याप्रकारचे शिक्षण विद्यालयांतून देण्यात आले,ज्याप्रकारे कामगार अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करण्यात आले,त्या साऱ्या गोष्टींत समाजवादी,वर्गसंघर्षाची कल्पना अध्याहृत धरण्यात येत असे.याचाच परमोत्कर्ष म्हणजे १९७६ साली,देशातल्या लोकशाहीचा गळा आवळण्यात आलेला होता,त्याच आणीबाणीच्या काळात समाजवादी हे बिरुद घटनेच्या मथळ्यातच कोंबण्यात आले.

 १४.०९ वर्गसंघर्षाची विचारसरणी मला माझ्याभोवती वावरणाऱ्या सर्वसामान्य कामगारांत रुजताना दिसत नव्हती,अनुभवास येत नव्हती.कम्युनिस्टांच्या शास्त्रीय परिभाषेत बोलायचे तर कामगारांच्या वर्ग-जाणिवा पुरेशा प्रखर झालेल्या नव्हत्या.आजही मला त्या तशा प्रखर दिसत नाहीत.

८२ सुरवंटाचे फुलपाखरू