पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्जवसुलीची चिंता मी कशाला वाहावी असा विचार मी केला नाही.वरवर पाहता,व्यवस्थापनाच्या अपेक्षित कामाशी,जॉब स्पेसिफिकेशनशी त्याचा संबंधच काय असाही मुद्दा पुढे येऊ शकतो.पण मीच माझे जॉब स्पेसिफिकेशन सतत लिहीत गेलो आहे.
 १३.१८ जुन्या युनियनने माझ्या कंपनीचे नुकसान केले होते.माझ्यावर त्यांची नुकसानभरपाई करून देण्याची कोणतीही जबाबदारी नव्हती.किंबहुना,ही उचल माझ्या कंपनीवर दबाव आणण्याच्या स्पष्ट हेतूने दिली गेलेली होती.तिची परतफेड कंपनीने करण्याचा प्रश्नच नव्हता.कंपनीने ती केलीही नाही.मी व्यवस्थापक म्हणून ती कामगारांकरवी करवली.माझे बांधव,जे सहकर्मचारी त्या युनियनचे ऋणाईत होते त्यांनी ऋणमुक्त होणे हे त्यांचे कर्तव्य होते.त्याची त्यांना जाणीव करून देऊन,कृती करवून घेणे हा वैयक्तिक दृष्ट्या धोक्याचा भाग होता.नवीन आलेल्या युनियनला माझा जुन्या युनियनशी लागाबांधा ठेवण्याचा हा प्रकार अविश्वासाचा वाटण्याची शक्यता होती.वरवर पाहता,तो निर्णय त्यांच्या अ-हिताचा होता.तो त्यांच्या गळी उतरवणे हे सोपे काम नव्हते.हे धर्मसंमत होते,पण नाकापुढचेच पाहून विचार करायचा असे ठरवले तर,व्यवहाराशी विसंगत होते.आरजे मेहतांच्याबद्दलचा कंपनीच्या कामगारांच्या मनातला विश्वास संपला होता.पण या पैशाच्या वसुलीसाठी त्यांनी उपद्रव करत राहणे स्वाभाविक होते.ती शक्यता होती.व्यापारी विचाराचा माणूस बुडत्या धंद्यात घुटमळत राहत नाही.त्यांची या बुडत्या दुकानातली गुंतवणूक मोकळी करून देण्यात व्यावहारिक स्वार्थही होता.परिणाम अपेक्षित असा झाला.मेहतांनी हा युनिट सोडून दिले आणि कामगारांनी नवी निवडून आणलेली समिती स्थानिक काम करणाऱ्या माणसांच्या नेतृत्वाखाली दृढमूल झाली.

 १३.१९ मला स्वतःला मूळ भारतीय विचारधारेशी असलेली ही बांधिलकी महत्त्वाची वाटते. सामाजिक व्यवहारात विश्वास जागवणे महत्त्वाचे आहे.पाश्चिमात्य समाज व त्यांचे धर्मग्रंथ हा विश्वास महत्त्वाचा मानतात.मग या साऱ्या प्रकारातले भारतीय वेगळेपण कशात होते? जर त्या कामगारांनी स्वतः आरजेंचे पैसे परत केले असते तर त्यांचे कृत्य त्यांचे व्यक्तिगत व त्यांच्या घरच्या भारतीय संस्कारातून झाले असते,पण साऱ्यांनीच पैसे परत दिले असते का?नव्या पुढाऱ्यांना,नव्या युनियनला ते आवडले असते का? खरे तर,या लढाईत नवीन पुढारी व त्यांची युनियन जिंकले होते.त्यांनी पराभूतांचा विचार करायची गरज काय होती? पण त्यांच्याही मनातल्या रामाला जागवणे आवश्यक होते एक कुटुंबातला कर्ता म्हणून.'मरणान्तानि वैराणी' हा

७६ सुरवंटाचे फुलपाखरू