पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वसूल करायचे.इथे,त्यांची युनियन कामगारांनी सोडलेली होती.त्यांच्यावर त्यांचे नियंत्रण शिल्लक राहिलेले नव्हते.
 १३.१४ ज्यावेळी कामगारांनी काम भरून दिले व कंपनीने त्यांचा कापलेला पगार त्यांना द्यायचा निर्णय घेतला तेव्हा जुन्या-नव्या सर्व कामगारपुढाऱ्यांना मी एकत्र बसवले व नवीन येणाऱ्या युनियनच्या संमतीने ज्यांनी ज्यांनी अशी उचल घेतली होती त्यांच्या त्यांच्या भरपाईच्या रकमेतून ती उचल कापून घेऊन मुंबई मजदूर सभेला चेकने देऊन टाकली!त्या कामगारांनी ती रक्कम कापायला स्वखुषीने संमती दिली.समाधानाने कापून दिली.आरजे मेहतांच्या युनियनने गुंतवलेले सर्व पैसे त्यांना परत मिळाले!
 १३.१५ युनियन बदलल्यानंतर.जुनी युनियन परास्त झाल्यानंतर सहसा कोणी तिची आठवण ठेवत नाही.युनियनचे व माझे मतभेद झाले,विकोपास गेले,त्यानंतर पुन्हा कधी त्या युनियनशी संपर्क आला नाही.पण 'युनिकेम'च्या कामगारांनी,माझ्या सहकर्मचाऱ्यांनी युनियन बदलली म्हणून पैसे बुडवले नाहीत.नव्या-जुन्या पुढाऱ्यांनी व भारतीय कामगार सेनेने यात जी समजदारी दाखवली ती मोलाची गोष्ट होती.या घटनेचे अद्वितीयत्व मी 'युनिकेम' बुलेटिनमध्ये लगेच नोंदवले.
 १३.१६ सामाजिक जीवनातल्या विश्वासाची महती अशा उदाहरणांतून घडत असते.माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांत ही भावना मी जागृत ठेवू शकलो याचे श्रेय,माझ्या मते,परस्पर संवादाला आहे. कुणाच्या कर्जात राहू नये,कर्जाची फेड करावी हे तर सगळ्या धर्मात सांगितलेले आहे.हिंदू समाजात तर आपलेच नव्हे तर आपल्या वडिलांचे,आजोबांचे कर्ज फेडणे हे व्यक्तीचे कर्तव्य मानले जाते.हे कर्ज फिटल्याशिवाय मृतात्म्याला स्वर्गात प्रवेश मिळत नाही अशी मान्यता आहे.ही श्रद्धा मी निर्माण केलेली नाही.ही या देशातल्या,भूमीतल्या,मातीतल्या गुणांचा भाग आहे.

 १३.१७ या समाजात वावरणारा एक व्यवस्थापक म्हणून मी या श्रद्धेशी माझ्या सहकर्मचाऱ्यांचा व्यवहार जोडून दिला,इतकेच.त्यांनी त्या श्रद्धेचे पालन करावे व त्यांच्या पूर्व युनियनचे कर्ज बुडवू नये हे पाहिले.माझ्या अधिकाराचा वापर या धर्मसंमत आचरणाशी जोडला.कामगारांचे पुढारी,युनियन यांनी माझे हे म्हणणे मानले,कारण त्याच्या मनोभूमिकेचे पोषण याच समान श्रद्धेवर झालेले होते.त्यांच्या नसनसात तीच श्रद्धा होती.मी फक्त त्या समान श्रद्धेची आठवण करून दिली.त्यांचे त्यांना काय ते ठरवू दे,मला काय त्याचे,किंबहुना ज्या युनियनने माझे उत्पादन खोळंबवून ठेवले होते.त्यांच्या

सुरवंटाचे फुलपाखरू ७५