पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १३.१० माझी कोकणच्या मातीत वाढ झालेली असल्याने समानता या मूल्यावर माझी खोल श्रद्धा आहे.मी अधिकारपदावर आहे म्हणजे मी माणूस म्हणून श्रेष्ठ आहे असे मी कधी मानले नाही. माझी जबाबदारी,माझे शिक्षण,माझे ज्ञान,माझा अनुभव हा इतर सहकर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वरचा आहे हे स्पष्टच होते, पण माणूस म्हणून मी त्याच्यासारखाच आहे.वेगळेपण अधिकारात,कार्यक्षमतेत,ज्ञानात आहे. श्रेष्ठत्व कामात, माणसात नव्हे हा मुद्दा माझ्या मनात स्पष्ट होता. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक कामगाराला मी ते स्पष्ट शब्दांत सांगत आलो होतो.मी व माझी खुर्ची ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.केव्हाही आभार, उपकार मानायचे असतील तर ते खुर्चीचे माना हे मी आवर्जून सांगत असे.
 १३.११ सहा महिने मंद काम, काफ्लेला पगार - तोही कोर्टात भरलेला आणि कोर्टाची कामे कोर्टाच्या गतीने चाललेली म्हणून 'युनिकेम'चे कामगार कंटाळले. १९६५ साली बावन दिवसांचा अयशस्वी संप चालवून कंटाळलेले कामगार जसे महाराष्ट्र वर्कर्स युनियनला रामराम करून परत आले होते तोच प्रकार ३ डिसेंबर १९७९ ला घडला.'मी मंद काम आंदोलन संपवून कामावर रुजू होत आहे' असे लेखी निवेदन देऊन कामगार त्या दिवसापासून कामावर रुजू झाले.मंद कामामुळे झालेले त्यांचे आणि कंपनीचे होत असलेले नुकसान मी लोकांना सतत सांगितलेले होतेच.त्यासाठी बुलेटिनचा वापर केला होता.
 १३.१२ कामगार आरजे मेहतांच्या दीर्घसूत्री कारभाराला कंटाळले.कामगारांनी भारतीय कामगार सेनेच्या झेंड्याखाली कंपनीतल्याच तरुण कामगार नेत्याच्या कर्तेपणाच्या भूमिकेतून युनियन बदलली. नवी विटी नवे राज्य सुरू झाले.कामगार प्रतिनिधी गुप्त मतदान पद्धतीने निवडले गेले.म्हणजे नवी युनियन प्रातिनिधिकत्वाची पहिली पायरी सहज ओलांडून गेली.कायदेशीर मान्यता मुंबई मजदूर सभेकडे चालू राहिली.कंपनीची नव्या निर्वाचित प्रतिनिधींबरोबर चर्चा होऊन,मंद काम आंदोलनाच्या काळात राहिलेले काम कामगारांनी भरून द्यायचे व कापलेला पगार कंपनीने त्यांना द्यायचा असा करार केला.

 १३.१३ त्याप्रमाणे कामगारांनी काम केले व कंपनीने कापलेल्या पगाराची भरपाई केली.पण भरपाई देत असताना 'युनिकेम'च्या कामगारांनी, मुंबईतल्या सबंध कामगार चळवळीच्या तोपर्यंतच्या इतिहासात कधीही न घडलेली एक गोष्ट केली. आरजे मेहतांनी मंद काम आंदोलनाच्या काळात साधारण दीड लाख रुपये कामगारांना उचल दिली होती किंवा युनियनचे पैसे गुंतवले होते.त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने,असे पैसे कंपनीशी करार करताना फरकाच्या रकमेतून

७४ सुरवंटाचे फुलपाखरू