पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमुख




 काटेरी व माणसाला त्रास देणाऱ्या 'सुरवंटाचे फुलपाखरू' हा निसर्गात घडणारा चमत्कार, खुद्द या लिखाणाच्या बाबतीत घडलेला आहे. मी याचा पहिला खर्डा १९९४ सालापासून २००४ सालापर्यंत तयार केला. तो काही मित्रांना छायाप्रतींच्या स्वरूपात वाचायला दिला. तो त्यांना आवडला. ते लिखाण पुस्तक म्हणून छापावे असा विचार त्यातून पुढे आला, पण हातून कृती घडली नव्हती.

 माझा अनुभव मानव-संसाधन-संबंधीच्या कामाचा, तो मराठीतून नवीन धंदा-उद्योग करू इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या मराठी व्यवस्थापकीय उमेदवारांच्या हाती पडावा असे वाटत होते. छोट्या उद्योजकांच्या कारखान्यांना बरे दिवस आले की लगेच तिथे 'लेबर प्रॉब्लेम' झाला आहे असे कानावर यायचे. ते उद्योजक निरुत्साही झालेले दिसायचे. माझे या क्षेत्रातले अनुभव त्यांच्यापर्यंत पोचवावे असे वाटे. हा वाचक-समूह छोटा असणार हे अपेक्षित होते. त्यामुळे मूळ लिखाण जरी २००४ सालापर्यंत पुरे झालेले होते तरी त्यानंतरची पाच वर्षे ते सुरवंटासारखे माझ्यापाशी कोषात पडून होते.

 पाच महिन्यांपूर्वी, माझे मित्र वैद्य भिकाजी केशव पाध्ये-गुर्जर यांनी याची प्रत दिनकर गांगल यांच्या हाती पडण्याची व्यवस्था केली. तिथून मग या लिखाणाला पंख फुटले. त्याचे फुलपाखरू झाले आहे की नाही हे वाचकांनी ठरवायचे आहे.

 सगळेजण वैश्विकीकरण (ग्लोबलायझेशन) या विषयाविषयी बोलतात, पर्यावरणाविषयी बोलतात, तेव्हा तो जणू काही हल्लीच उद्भवलेला विचार

सात