पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कंत्राटदाराकडे सोपवतात.त्याच्याशी घासाघीस करून काय ते ठरवले जाते.मुंबईतल्या कामगारांनी सध्याच्या कामगार कायद्यांप्रमाणे शक्य असल्यामुळे अनेक औद्योगिक शांततेचे कंत्राटदार असलेल्या युनियन्स वर्गणी देऊन आपल्याशा केलेल्या असतात.जो जास्त पैसे मिळवून देण्याची भाषा करील तो पुढे जातो.तेव्हा कामगार वर्गयुद्ध वगैरे काही करत नसतात.कामगार म्हणून त्यांची वर्ग अशी आयडेंटिटी नसते.ती एक सोय असते.दोन पैसे जास्त देईल तो आपला हे लोकांना सहज कळते.माझ्यासारखेच,माझ्याअनुभवाविरुद्धचे किंवा सर्वस्वी वेगळे असे अनुभव अनेकांना आलेले असतील.त्यांची नोंद होणे हे मला महत्त्वाचे वाटते.म्हणून माझ्या या पुस्तकाचा मी हा शेवट न समजता सुरुवात मानतो.
 १८.१० भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे मूलाधार कसे वेगळ्या पायावरचे असायला हवेत याचा ऊहापोह करून त्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात या संकल्पनांचा केलेला वापरही लिहिला,एका भारतीय माणसाने त्याला समजलेल्या भारतीयत्वाच्या संदर्भात त्याने केलेले व्यवस्थापनातले काही प्रयोग एवढ्या सीमित अर्थाने ही मांडणी आहे.भारतासारख्या मोठ्या देशात अनेक भाषिक,प्रांतिक विचारधारा अस्तित्वात असणार आणि तिथले व्यवस्थापक त्यांच्या संदर्भात व्यवस्थापन करत असणार.मी माझ्या अनुभवांचा या प्रदेशाच्या संदर्भात विचार करून काही गोष्टी केल्या व त्यातल्या ज्या यशस्वी किंवा अयशस्वी झाल्या त्यांची ही नोंद आहे.

 १८.११ माझ्यासारख्या अनेक व्यवस्थापकांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रयोग केले असतील.मुळाशी जोडणारे असे लेखन मी वाचलेले नाही.भारतीय लेखकांनी इंग्लिशमध्ये लिहिलेल्या व्यवस्थापनशास्त्रावरच्या पुस्तकांतही हा शोध आढळलेला नाही.'उपक्रमोपसंहारौ अभ्यासोऽपूर्वताफलम् ।अर्थवादोपपत्तीच लिंगं तात्पर्य निर्णये' या दृष्टीने विचार करता माझ्या या लेखनाची अपूर्वता वा उपलब्धी ही एवढीच आहे.कोठल्याही सामाजिक व्यवहाराच्या संदर्भात कोठलीही पूर्वसूरींच्या सारांशाची झापडे जर डोळ्यांवर बांधून आपण लोकांच्या व्यवहारांकडे किंवा वागणुकीकडे पाहिले तर आपल्या झापडांचा किंवा चष्म्याचा रंग हा त्यात अडथळा ठरतो.तेच सामाजिक वास्तव वेगळ्या चौकटीतून पाहिले,वेगळ्या चष्म्यातून पाहिले तर वेगळे दिसते व ज्याला.व्यवस्थापन करायचे आहे म्हणजेच माणसांकडून कामे करवून घ्यायची आहेत त्याला या चौकटींचे,चष्म्यांचे सजग भान असायला हवे.

११० सुरवंटाचे फुलपाखरू