पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाळी संपवून लोक घरी जात.पहिल्या पाळीचे कामगार लवकर यायचे म्हणून व्यवस्थापकांची तक्रार असायची.ते लवकर यायचे ते कंपनीत संडासांची सोय होती व घरी नव्हती यासाठी.पण हे समजून न घेतल्यामुळे सुपरवायझर तक्रार करायचे.समजावून सांगितल्यावर मग ह्या तक्रारी संपल्या.
 १८.०३ पन्नास दिवसांचा संप झाला.तो पूर्णपणे फिस्कटला पण त्यातून जे नेतृत्व निर्माण झाले होते,त्यांच्या नेतृत्व-ऊर्जेचा वापर होणे आवश्यक होते.त्यांच्यातल्या पुढाऱ्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांची कल्पना पुढे आणली.त्यासाठी कंपनीने थोडे पैसे बिनव्याजी कर्जाऊ दिले पण त्यांना कंपनीच्या हमीवर इतरत्र कर्जे मिळाली.या साऱ्या उलाढालीत कंपनीचा एकही पैसा बुडाला नाही.यामुळे जवळजवळ एकशेवीस लोकांना माझ्या कार्यकाळात डोक्यावर छप्पर मिळाले.त्यांची मुले शिकलीसवरली,त्यांतले बरेचसे सुस्थितीत आहेत.डोक्यावर स्वतःचे छप्पर असण्यामुळे हा फरक पडला.
 १८.०४ इतक्या कुटुंबांशी असे संबंध निर्माण झाल्यामुळे आम्ही एक नवीनच गोष्ट सुरू केली.कामगारांच्या ज्या मुलांना त्यांच्या त्यांच्या वर्गात पहिल्या दहात क्रमांक मिळायचा त्यांना बक्षिसे द्यायला सुरुवात केली.बक्षिसांची रक्कम नगण्य होती.त्या मुलांसाठी बालनाट्याचा कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली.१९७८ साली बालनाट्य चळवळीतल्या अग्रणी सुधा करमरकर यांनी पंतप्रधानांसमोर तक्रार केली होती,की बालनाट्य चळवळीला कोणी स्पॉन्सर मिळत नाहीत.मी आमच्या मुलांना चांगली मराठी बालनाट्ये दाखवण्याचा आणि त्यांचे बक्षिसे देऊन सन्मान थोडासा खाऊ व नाटकाचा प्रयोग असा जोड कार्यक्रम सुरू केला.ह्या मोठ्या खर्चाच्या गोष्टी नव्हत्या पण इतरत्र तशा कोणी केल्याचे त्या काळात तरी मला आढळलेले नाही.कामगार माझे बांधव आहेत,माझ्या मुलांइतक्या संधी त्यांच्या मुलांना मिळत नाहीत तर त्यांच्यासमोर या गोष्टी याव्यात ह्या भावनेने हे मी करू शकलो.

 १८.०५ त्याच प्रकारात आणखी भर घातली,ती म्हणजे ही बक्षिसे कंपनीच्या माझ्यासारख्या किंवा वरिष्ठ डायरेक्टरांच्या हस्ते न देता पहिल्या क्रमांकाने त्या त्या वर्षी एसेस्सीला मुंबईतून आलेल्या मुलांच्या हस्ते देऊन त्यांचेही कौतुक त्यांच्याच समवयस्कांच्या हस्ते करून एक नवीन प्रथा सुरू केली.करता करता,या गोष्टी घडत गेल्या.युनियनकडून चांगले सहकार्य मिळाले.घराघरात केवळ आमचे 'मासिक बुलेटिन नव्हे तर या गोष्टीही पोचायच्या.त्यातून कंपनी मुंबईसारख्या महानगरात परिवारभावना निर्माण करू शकली.

१०८ सुरवंटाचे फुलपाखरू