पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय अठरावा





 १८.०१ जेव्हा मी एक व्यवस्थापक म्हणून विचार करू लागलो व अनुभवाने जसजसा माझ्या या मूळ परंपरेशी जोडला गेलो,तशा अनेक गोष्टी मला करता आल्या.बऱ्याच वेळा आपल्यासमोर प्रश्न पडतो,की आपण फार छोटे आहोत,प्रश्न फार मोठा आहे,म्हणून आपण काही करू शकणार नाही. तेव्हा सुस्कारे सोडणे एवढेच आपल्या हाती आहे.पण जर काही करायचेच ठरवले तर अनेक छोट्याछोट्या गोष्टी करता येतात.

 १८.०२ मी ज्या कंपनीत काम केले ती जोगेश्वरीत आहे.१९६४ साली संपूर्ण पूर्व जोगेश्वरी हा भाग ही एक मोठी झोपडपट्टी होती.आमच्या कंपनीत काम करणारे अनेक कामगार त्या झोपडपट्टीत राहात असत.मी त्या कंपनीत काम करायला सुरुवात केली त्याच्या आधी तिथे उत्तर-हिंदुस्थानी झोपडीमालक व कोकणातले कामगार यांच्यामध्ये मोठी दंगल झाली होती.ही सर्व गावच्या गाव जमीन-जागा कागदोपत्री जमशेटजी जिजीभाय ट्रस्टच्या मालकीची होती.प्रत्यक्ष ताबा जोगेश्वरी पश्चिमेला राहणाऱ्या दुधाच्या तबेल्याच्या मालकांनी व त्यांच्या नोकरांनी लाठीच्या जोरावर घेतलेला होता.तिथे त्यांनी झोपड्या बांधल्या होत्या.आमच्या कंपनीतले बरेच कामगार तिथे भाडेकरू म्हणून राहात.त्यावेळी त्या भागात पाण्याचे नळ,संडास,वीज वगैरे काहीच सोयी नव्हत्या.सकाळी सात वाजता पहिली पाळी सुरू व्हायची व तिसरी

सुरवंटाचे फुलपाखरू १०७