पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जास्त असतो.कापड गिरणी कामगारांपेक्षा पेट्रोलियम कंपन्यांत काम करणारे किंवा औषध उद्योगातले मेडिकल रिप्रेझेंटेटिव हे सुशिक्षित कामगार जास्त वर्गसंघर्षवादी असतात.वेगळी कॅटिन्स, वेगळ्या मुताऱ्या,वेगळ्या सवलती हा त्यांच्या मनातल्या आपण उच्च जातीतले आपण आहोत या भावनेचा आविष्कार असतो.वर्गभावनेचा नव्हे.
 १७.१२ वर्कर हा शूद्र आहे, मुख्य म्हणजे तो आपल्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे आणि माणूस म्हणून समान आहे हे तत्त्व उच्च विद्याविभूषित अधिकाऱ्यांच्या मनाच्या चौकटीतच नसते.माझ्या वरिष्ठांनी मला अमेरिकन पुस्तकांतल्या 'थियरी वाय','ह्यूमन साइड ऑफ मॅनेजमेंट' प्रमाणे वागावे व मला वागवावे म्हणजे द्विज आहे त्यामुळे माझ्या पोळीवर सर्व तूप हवे.खरा कट्टर मालकही वागणार नाही एवढ्या अनुदारपणे हीच माणसे हाताखालच्या माणसांशी वागताना मी पाहिले आहे. ह्या शैलीचा या भूमीशी संबंध नाही.हजार वर्षांच्या पारतंत्र्याने घट्ट झालेल्या जातींच्या भिंती व उतरंड ह्यांनी हे गंड निर्माण झालेले आहेत.ही काजळी किंवा डोळ्यांवरची ढापणे काढून आपल्याला त्यांच्या मूळ विष्णुरूपाची जाणीव करून द्यायला हवी आहे.

 १७.१३ प्रश्न या चौकटी बदलण्याचा आहे. ट्रान्स्फॉर्मेशनचा अळीतून-सुरवंटातून फुलपाखरू, बनण्यास मदत करण्याचा,आहे.माणसे चांगली-वाईट ठरवण्यात वेळ घालवण्याऐवजी त्यांच्यातूनच आपण सुसंवादी संघटना कशा बनवू याचा विचार करण्याचा आहे.प्रश्न या दृढबद्धमूल झालेल्या चौकटी कशा बदलायचा याचा आहे आणि तो सुद्धा दडपणाने नव्हे तर माणसांची मने बदलून.माणसे घडवण्याचा हा प्रश्न आहे.विवेकानंदांनी याला 'मॅनमेकिंग प्रोजेक्ट' असे म्हटले आहे.

१०६ सुरवंटाचे फुलपाखरू