पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय सतरावा




 १७.०१ आपल्याच घरात व आपल्याच देशात आपण कसे परके होतो याचे अनेक अनुभव मी माझ्या व्यवस्थापकीय आयुष्यात घेतले.अगदी सुरुवातीसुरुवातीला काही नवीन सत्ये उमजली.मी 'युनिकेम'च्या जोगेश्वरी कारखान्यात काम करायला एप्रिल १९६४ मध्ये सुरुवात केली,तेव्हाच काही काळाने न्या.मेहेर यांचा बोनस निवाडा प्रसिद्ध झाला.त्याबद्दल कामगारव्यवस्थापन व्यावसायिकांत चर्चा चालायची.युनियन्सची घोषणाच मुळी बारा महिन्यांचे काम व तेरा महिन्यांचा पगार अशी होती.ती त्या लवादाने मान्य केली व ८.३३ टक्के बोनस हा कमीत कमी बोनस म्हणून मान्य केला गेला,त्याच्यावर आधारलेला कायदा १९६५ साली पारित झाला.नोंदण्यासारखी गमतीशीर गोष्ट आहे.भारतात १९५७ साली दशमान चलन अस्तित्वात आलेले होते.तरीही बोनसचे प्रमाण ८, ८.५, ९, ९.५ किंवा १० टक्के कमीतकमी असे ठरवले गेले नाही.ते जुन्या घोषणेला चिकटून एकबारांश म्हणजेच ८.३३ टक्के असे झाले.हा शब्दच्छल वाटेल पण तो तसा नाही.एक महिन्याचा बोनस ह्या घोषणेने एकदा का तुमच्या मनाचा कबजा घेतला की मग ८, ८.५ असे त्याचे रूपांतर होऊ शकत नाही.यामुळे त्या संगणक-पूर्व जगात आकडेमोड उगीचच वाढून बसली.अनेक अनुत्पादक कारकुनी नोकऱ्या निर्माण झाल्या.घोषणा कालबाह्य झाल्या तरी ते जोखड मानेवरून सहजासहजी उतरवणे कठीण असते.शास्त्रकारांनी 'शब्दो नित्यः' असे जे म्हटले आहे ते उगाच

१०२ सुरवंटाचे फुलपाखरू