पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गांधींची उपोषणाची कल्पना ही चेष्टेची गोष्ट मानली.त्यानंतरच्या काळात पुढच्या पिढीने उपोषणाचे साखळी उपोषण करून त्या संकल्पनेचा कचरा करण्याचे काम केले.अहमदाबादच्या कापड गिरणी मालकांच्या पढायच्या समोर त्याचीच बहीण कामगारांच्या बाजूने आत्मक्लेशासाठी उपोषणाला बसली तेव्हा ते धर्मयुद्धच बनले.त्या गृहस्थधर्मी भावाला त्याची घरातलीच बहीण उपाशी असताना जेवता कसे येणार?अशा स्वरूपाचा उपाय,इतर सर्व उपाय थकल्यावर योजणारा महात्मा एखादाच असतो.हा मार्ग भारतीय विचारधारेशी जास्त जवळचा होता.इंग्लिश वाघिणीचे दूध प्यालेल्या व्यवस्थापकांना खुळा वाटणारा होता.
 १५.१३ 'युनिकेम' कंपनीचा रायगड जिल्ह्यात रोह्याला एक कारखाना आहे.वसंतराव खानोलकर हे तिथल्या कामगारांचे नेमस्त प्रवृत्तीचे पुढारी होते.त्यांची युनियन त्या कारखान्यात मान्यताप्राप्त असताना ते जपानला जाऊन आले.त्यांनी तिकडे कामगारांचे हे काळ्या पट्टयांचे तंत्र पाहिले.मी रोह्याच्या 'युनिकेम'च्या कारखान्यात वेतनविषयक करारांची परंपरा निर्माण केली होती, पण त्यावेळी वाटाघाटी अडकून पडल्या होत्या.तिथे मागण्या धसास लावण्यासाठी त्यांनी नोटीस लावून काळ्या पट्टयांनी निषेध व्यक्त करणे आरंभले.मला ही बातमी फोनवर समजली.रोह्याचे तेव्हाचे व्यवस्थापक बारदेशकर हे तरुण उमदे ख्रिश्चन गृहस्थ होते.त्यांनी मला सांगितले,की उत्पादन चालू आहे,संप नाही,पण कामगारांनी काळ्या पट्टया लावून काम चालू ठेवले आहे.मी त्यांना सांगितले,की याचा अर्थ तुम्ही प्रत्यक्ष संप सुरू आहे असाच समजा.संप सुरू असताना तुम्ही व ज्या वेगाने कारवाई केली असती ती लगेच करा.बोलणी अडकली आहेत ती त्वरित सुरू करा आणि तंटा संपवण्याचा प्रयत्न करा.माझ्या मंबईतल्या काही सहकाऱ्यांचे मत निराळे होते.त्यांचे म्हणणे असे होते,की काळ्या पट्टयाच काय पण काळे कपडे घालून जरी लोक कामावर आले तरी चिंता करू नका.संप करण्याची त्यांची ताकद नाही म्हणून त्यांनी ही नाटके सुरू केली आहेत.काहीही करण्याची आवश्यकता नाही.मला हे पटले नाही.रोह्याचे व्यवस्थापक बारदेशकर ख्रिश्चन असल्यामुळे काळ्या पट्टयांचा औद्योगिक संबंधांच्या मृत्यूचा संदर्भ त्यांना जास्त जाणवला असेल पण त्यांनी माझा मुद्दा मानला व अंमलात आणला.तातडीने समझौता झाला.उत्पादनात खंड न पडता त्रैवार्षिक वेतन करार करण्यात आला!'युनिकेम'च्या रोह्यातल्या कामगारांनी संपाला काळ्या पट्टयांचा वापर हा पर्याय मान्य केला व वापरला.

 १५.१४ वसंतराव खानोलकरांसारख्या नेतृत्वाने संपाचा वेगळा प्रयोग

सुरवंटाचे फुलपाखरू ९३