पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बनतात.कराराचा कायदा सोडून,त्याला कल्याणकारी कायदा म्हणून राज्यकर्त्यांनीच हे कुरण मोकळे करून दिले आहे.
 १५.१० युनियन ही कामगारांच्या वतीने सामूहिक सौदा करणारी संस्था असते.श्रमाची बाजारभावाने किंमत मिळवून देणे हे तिचे काम असते.पगार कंपनी देत नसते तर कंपनीने उत्पन्न केलेला माल पगार देत असतो.कंपनी स्पर्धेत टिकली तरच पगाराची शाश्वती असते.उत्पादन केलेली वस्तू बाजारात खपली तर कंपनी चालते.तिथे सतत नवे स्पर्धक येत असतात.जागतिकीकरणाच्या विरुद्ध ओरडा केला जातो,तो संरक्षित वर्गाकडून.त्यात मालक आले व कामगारही आले.भारतीय शेतकऱ्यांशी स्पर्धेत टिकू शकणार नाही म्हणून युरोपीयन शेतकरी संप करतात.अमेरिकन कामगार त्यांच्या सरकारवर दबाव आणून आयात निर्बंध आणू पाहतात.जगातले सर्व कामगार एक नाहीत हे सिद्ध करतात.कंपनी पगार देत नाही तर ती पगार वाटत असते हा विचार सर्वोच्च भांडवलशहा म्हणून ज्याची गणना केली जाते त्या हेन्री फोर्ड या अमेरिकन उद्योगपतीचा आहे.कारखाना सरू करणे वा बंद करणे हा मालकांचा अधिकार असतो,जसा श्रम विकणे किंवा न विकणे हा हक्क कामगारांच्या सामूहिक निर्णयाचा असतो.कच्चा माल,यंत्रे,जमीन,व व्यवस्थापन हे उत्पादनाचे जसे घटक आहेत तसाच श्रप हा घटक आहे.त्याच्याही किंमतीत चढउतार होणे हे बाजारव्यवस्थेत अपरिहार्य असते.त्यात लवचीकता असेल तरच स्पर्धेत टिकता येते.मालकाच्या कंपन्या सुरू करण्याचा,वाढवण्याचा,तसेच बंद करण्याचा हक्क पाश्चात्य देशात मान्य केला गेलेला असतो.
 १५.११ भारतातली परिस्थिती त्रिशंकूसारखी लटकणारी आहे.भारतीय परंपरा समन्वयाची आहे,झगड्याची नाही.असे असल्याने कारखाना बंद पाडणे हा कोणाचा अधिकार असू शकतो असे लोकांना वाटत नाही.तडजोड व्हावी ही सगळ्यांची भावना असते.सर्व माणसेच काय,पण सर्व सजीव हे एकमेकांची भावंडे आहेत,कारण ते एकाच परमतत्त्वाचे अवयव आहेत असे मानणाऱ्यांची भारतीय परंपरा आहे.औद्योगिक संबंधातले तंटे कौटुंबिक कलहाप्रमाणे सोडवले जावेत ही लोकांची अपेक्षा असते.काळ्या पट्टयांचा संप ही कल्पना खरे तर भारतीय व्यवस्थापकांना व मालकांना जवळची वाटायला हवी.

 १५.१२ महात्मा गांधींचा उपोषणाचा किंवा आत्मक्लेशाचा भारतीय मार्ग,त्यांचे अनुयायी म्हणवणाऱ्यांनी त्याचा ऊठसूट वापर करून बदनाम केला.इंग्लिश विद्येवर पुष्ट झालेल्या भारतातल्या अभिजन वर्गाने महात्मा

९२ सुरवंटाचे फुलपाखरू