Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
सीताचरित्र.

होती. त्या सुरजन-मनमोहिनी, सुरम्यतट शोभिनी जान्हवीची शोभा पाहून व सीतेला ती दाखवीत असतां रामचंद्राला एक वृक्ष दिसला. तो इंगुदी वृक्ष होता. तेथेच रात्रभर राहण्याच्या विचाराने रामचंद्रांनी सुमंताला रथ थांबविण्यास आज्ञा केली. रथांतून उतरून ते सर्व- जण तेथेंच विश्रांति घेत बसले.
 शंगवेरपूरच्या राजाचें नांव गुह होतें. तो निषाद-मिल जातीचा होता. तो बालपणापासून रामचंद्राचा मित्र होता. रामचंद्र आप- ल्याच हद्दींत येऊन विश्रांति घेत आहेत, हें वर्तमान ऐकून त्याला आनंद झाला. तो आपल्याबरोबर मंत्री व वृद्ध लोक घेऊन राम- चंद्राकडे आला. त्याने आपल्या मित्राच्या स्वागतार्थ बरोबर फळें गैरे आणिली होती. दोघेहि मोठ्या प्रेमाने भेटले. रामचंद्राचा गूहाने मोठ्या प्रेमानें सत्कार केला. त्याचें आदरातिथ्य पाहून त्यांना संतोष वाटला. पण त्याच्या राजकीय थाटाच्या सत्काराचा रामचं- द्रांनी स्वीकार केला नाहीं. कारण ते वनवासी मुनीचे व्रत घेऊन वनांत आले होते. त्यामुळे बोच्याकरितां दाणा, वैरण त्यांनी घेतली. परंतु आपल्याकरितां कांहीं एक घेतलें नाहीं.
 संध्याकाळ झाली तसे रामचंद्रांनी संध्यावंदन केलें. संध्याका- ळचीं नित्य कर्मै आटोपल्यावर रामचंद्राकरितां लक्ष्मणानें स्वच्छ व थंडगार पाणी आणिले. तें पाणी पिऊन ते सीतेसह भूमीवर निजले... पहिल्याने कांहीं वेळ लक्ष्मण रामचंद्राचे पाय दात्रीत बसला, नंतर हातांत धनुष्यबाण घेऊन व वीरासन ठोकून तो बाजूला पहारा करीत राहिला. तो मुळींच निजला नाहीं.
 रामचंद्राच्या ठिकाणी लक्ष्मणाची अत्यंत प्रीति पाहून गूहानें त्याच्या भक्तीची व प्रेमाची अत्यंत प्रशंसा केली. जेव्हां रात्र फार झाली, व लक्ष्मण निजत नाहीं, असें गूहानें पाहिलं, तेव्हां तो म्हणाला, ' महाराज आपण आतां आराम करा. मी धनुष्यवाण