Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
सीताचरित्र.

करतात, तेच खरे बांधव होत. तेच खरे इष्टमित्र, व तेच खरे परिजन होत.
 आपल्या प्रजेची ती अनुपम भक्ति पाहून रामचंद्राच्या नेत्रां - तून अश्रुजलधारा वाहू लागल्या. त्यांनी त्या वेळेस कांहींच न बोलतां रथ वेगाने हांकण्याची सुमंतास आज्ञा केली. रथ आधींच वेगाने चालू लागला. पण पौरजनांनीं आपलें धैर्य सोडलें नाहीं. पुनः ते रथामागून धावू लागले. साधारण लोकांची तर गोष्ट निराळीच राहो. परंतु त्यांत जे वृद्ध लोक होते, व ज्यांच्यानें वाक्यमुळे रथाच्या मागें धांववलें नाहीं, ते रस्त्याच्यामध्येच उभे राहून उच्च स्वरानें आक्रोश करूं लागले. त्यांची ती कारुणिक स्थिति पाहून रामचंद्राचें हृदय दयार्द्र झालें. ते सीतेसह सर्व जनांबरोबर पायींच चालू लागले. याप्रमाणे चालत चालत ते तमसा नदीजवळ येऊन पोहचले. तेथें येतांच सूर्यास्त झाला. रात्र पडली. सुमंतानें थकलेल्या घाड्यांना दाणापाणी पाजले. इतक्यांत चहूंकडे काळाकुट्ट अंधार पडून रात्रीचें साम्राज्य सुरू झालें. जे पदार्थ दिवसा चांगले स्पष्ट दिसत होते, ते त्या अंधारांत लीन होऊन गेले. अंधकाराने आपले आधिपत्य सर्व पदार्थांवर स्थापित केलें. दिवसा चिवचिव करणाऱ्या चिमण्यांनी मौनव्रत धारण केलें. तमसेचें जलहि अंधकारांत विलीन झाले. रामचंद्राच्या रथाच्या मागें जितके लोक आले होते, ते सर्व तिच्या किनान्यावर येऊन मुक्काम करूं लागले. एक तर ते लोक विरहाने व्याकुळ होऊन मार्ग चालण्याच्या श्रमानें अगदी थकून गेले होते. त्यांची स्थिति खरोखर करुणाजनक होती.
 तमसा नदीच्या किनाऱ्यावर रामचंद्राच्या सभोंवतीं ते सर्व लोक जमले. सर्व जन दमले असल्यामुळे हळू हळू निद्रावश झाले. सर्व निजल्यावर सीता व लक्ष्मणासह रामचंद्र तमसेच्या तिरी बसून झाल्या गोष्टींचा विचार करूं लागले. त्यांना विषाद वाटला. शोकार्त