Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
सीताचरित्र.

अत्यंत दुःख वाटलें. रामाचा हा विचार पाहून तिला रागहि आला. परंतु तिचा को पहि साधारण स्त्रीप्रमाणेंच नीच भावयुक्त नव्हता.. तिच्या त्या कोपांत पवित्रता व पूर्णप्रेम भरलेलें होतें.
 सीतादेवी म्हणाली :- :--" नाथ, मला आपण नीच स्वभावाची स्त्री समजून का असल्या प्रकारें भाषण करतां ? आपलें हें भाषण ऐकून मला हासू येत आहे. आपण मला जी गोष्ट सांगि- तली आहे, ती आपल्यासारख्या सर्वशास्त्रपारंगत, महावीर, राजकुमाराला कदापिहि इष्ट नाहीं. असें सांगण्यांत आपलीहि निंदाच होत आहे. पिता, माता, भ्राता, पुत्र, व सून हीं सर्व आपल्या कर्माची फळे भोगतात, परंतु एक स्त्रीच जगांत अशी आहे की, जिला आपल्या पतीच्याच नशिबावर अवलंबून रहावें लागतें. असें आहे तर, ज्या अर्थी आपणाला वनवासाला जाण्याची आज्ञा आहे, त्या अर्थी ती मलाही जाण्याला झाल्यासारखीच आहे. मी आपणा- हून भिन्न नाहीं. पुरुषाची छाया पुरुषापासून भिन्न होते काय ! माता, पिता, व बंधु वगैरे हे तर निराळेच राहिले, पण स्त्री आपले स्वतःचे कल्याण किंवा बरें वाईटहि आपण स्वतः करूं शकत नाहीं.. तिच्या परम कल्याणाचे साधन, कल्याणस्वरूप, व एकमात्रगति तिचा पतिच आहे. जर आपण वनास जाण्याचे प्रस्थान ठेविलें आहे, तर मी आपल्यापुढेच आहे. ही गोष्ट मी आपल्या मनची सांगतें असें नव्हे, तर शास्त्रांतच असें लिहिलें आहे; आणि माझ्या बालपणी माझ्या मातापितरांनी मला असाच उपदेश केला आहे. याकरितां आपला सहवास मी सोडूं शकत नाहीं. मी तर आपला कांहीं अपराध केला नाहीं ! मग आपण मला येथे ठेवण्याचा हा असह्य दंड कां करूं इच्छितां हेंच मला कळत नाहीं. आपल्याबरोबर मी निर्जल व निर्जन वनांतहि सुखानें राहीन. तें भयंकर अरण्य- हि मला आपल्या सहवासानें मोठें सुखदायक होईल. मी त्रैलो-