मागे आम्ही सांगितलेच आहे कीं, ' रामचंद्र पुत्रवत् प्रजेचे पालन करीत होते. त्यांच्या राज्यांत कोणीहि मनुष्य निर्धन नव्हता, तसाच चिर- रोगीहि नव्हता. सर्व लोक मोठ्या प्रसन्नतेने आपापली कामे करीत असत. त्यांच्या सुशासनाने प्रजा इतकी संतुष्ट होती की, ती त्यांस पित्याप्रमाणें मानीत असे. त्यांनी चांगल्या राज्यपद्धतीने थोड्याच अवकाशांत प्रजेला आपल्या मुठीत ठेविलें, एवढेच नव्हे, तर प्रजेच्या धर्माचेहि त्यांनी उत्तम प्रकारें रक्षण केले. त्यांनी कोणाच्याहि धर्माला दुखविलें नाहीं. राजा प्रजेच्या धनाचा आणि जीविताचा जसा रक्षक असतो, तसाच तो प्रजेच्या धर्माचाहि शास्ता असतो. जो राजा प्रजेच्या धर्माचे रक्षण करीत नाहीं, तिची धार्मिक उन्नति करण्यास सहाय्य करीत नाहीं, तो फक्त नांवाचा मात्र राजा होय. जो राजा प्रजेच्या मालमत्तेचें रक्षण करून तिचें पुत्राप्रमाणे पालन करतो, आणि प्रजेच्या धर्माला धक्का पोहचू देत नाहीं, त्यालाच धर्मशास्त्रांत राजा ही उपमा दिली आहे. रामचंद्राप्रमाणे उदार, न्यायप्रिय, न्यायकर्ता, आणि धर्मात्मा राजा ज्या प्रजेचें शासन करीत आहे, त्या प्रजेचे खरोखर केवढे भाग्य ! त्याचे वर्णन किती करावे.
आपल्या प्रजेला सुखी आणि उन्नत पाहून रामचंद्रांना अपार हर्ष वाटे. ते निर्भयतेने राज्य करीत होते. ते कशालाहि भीत नसत, इतकी त्यांच्यांत निर्भयता होती. त्यांना जर भीति असेल तर ती दोन गोष्टींची होती. एक अधर्म आणि दुसरी अपयश, यांची.
पान:सीताचरित्र.pdf/२४०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सातवें कांड.
सीता वनवास.