Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावें कांड.

२०९

इच्छा होत असेल ती तूं मोकळ्या मनानें मला सांग. तें तुझें प्रिय- काम, ती तुझी इच्छा, मी मोठ्या आनंदाने पूर्ण करीन.
 हे आपल्या प्रिय नाथांचे प्रिय भाषण ऐकून सीतादेवी लज्जेनें खाली मुख करून किंचित् मंदहास्य करून बोलली की, नाथ, या वेळी मला ऋषींच्या आश्रमांचे दर्शन घ्यावे अशी प्रबल इच्छा झाली आहे. जेथें भगवती भागीरथीच्या तीरावर महामुनि तपश्चर्या करितात, तेथे जाऊन त्या पुण्य तपोभूमीचें दर्शन करावें असें मी इच्छिते. फार दिवसांकरितां नाहीं फक्त एकच दिवसाकरितां जर आपण मला वन्य आश्रमांचे दर्शन करविण्याची कृपा कराल आणि ही माझी इच्छा पूर्ण कराल तर उत्कृष्ट होईल.'
 सीतादेवीला पूर्वीपासूनच सृष्टिसौंदर्य पाहण्याची फार आवड होती, हे आम्ही मार्गे अनेक वेळा सांगितले आहे. तिच्या जीवन- चरित्रांत विशेषच असेल तर ती याच गुणामुळे आहे. राजमहिषी असून राज्यसुखाचा त्याग करून वनांतील फळे खाण्याची इच्छा होणे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट नव्हे काय? प्रिय स्वजन सोडून सिं- हमृगाकीर्ण अशा भयंकर वनांत जाण्याची प्रबळ इच्छा होणें हैं तिच्या प्रकृतिसौदर्य प्रियतेचें प्रत्यक्ष लक्षण नव्हे का ! परंतु हाय ! हे अभागी जानकी, ही तुझीं लालसा, ही तुझी वन्य आश्रमाबद्दलची दिक्षा तुझा सर्वस्व नाश करण्याला कारण होईल, हें तुला माहीत नाहीं. असो.
 प्रियतमा जानकीने हे भाषण ऐकून रामचंद्रांनी तिला दुसऱ्या दिवशीं तपोवनांत पाठविण्याचे कबूल केलें. तें ऐकून सीतेला आनंद झाला. तिला आनंदांत पाहून रामचंद्रहि उल्हसित अंत:- करणानें दुसरीकडे अन्य कामाला निघून गेले.