Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१४८
सीताचरित्र.


कूर लक्ष्मणाने रामचंद्राला कळविला. आपला मित्र युद्धाची तयारी करीत आहे. असें पाहून त्यांना हर्ष झाला. कांहीं दिवसांनी सुग्रीवाची फौज एकत्र झाल्यावर त्याने सीतेच्या शोधार्थ दूत रवाना केले. कोणी पूर्वेकडे गेले, कोणी पश्चिमेकडे गेले, कोणी उत्तरेकडे गेले. सीता दक्षिणेकडे असण्याचा संभव आहे, असें सर्वाना वाटे; त्यामुळे सर्वांत बलवान, बुद्धिमान, आणि नीतिज्ञ असे दूत तिकडे पाठविले. त्यांत महाबुद्धिमान हनुमान, महाबली अंगद, आणि सुनीतिज्ञ जांबवान हे मुख्य होते. राजा सुग्रीवानें सर्वांना सांगितले की, सीतेचा शोध करून तिचा पत्ता लागो, अथवा न लागो एक महिन्याच्या आंत सर्वांनी येथे हजर झाले पाहिजे. जे कोणी सीतेचा शोध लाविल्याशिवाय एक महिन्यावर दिवस लावितील, ते भयंकर दंडास पात्र होतील.
 रामचंद्राचाहि दक्षिण दिशेला जाणाऱ्या मंडळींवर विश्वास होता. त्या सर्वांत ते महाबुद्धिशाली हनुमानाला अधिक चतुर आणि स्वामि- भक्त. समजत होते. यामुळे जाते वेळेस रामचंद्रांनी आपल्या बो- टांतील आंगठी काढून हनुमानाजवळ दिली, आणि ते त्याला म्हणाले. ' प्रिय हनुमान, जर तुला कोठें सतिचा शोध लागून तिची भेट झाली तर तिला विश्वास पटण्याकरितां ही अंगठी दे.'
 राजाच्या हुकुमाप्रमाणे सर्व सैन्य, व दूत आपापल्या दिशेला निघून गेले. पूर्व दिशेला जें सैन्य गेलें, त्याचा मुख्य विनत होता. उत्तरेस गेलेल्या सेनानायकाचें नांव शतवली आणि पश्चिमेकडे गेले- ल्या सेनापतीचें नांव सुपेण होतें.
 एक मास पूर्ण होण्याला जेव्हां दोन तीन दिवस बाकी राहिले, आणि कोणीकडूनहि सीतेच्या शोधाची बातमी आली नाहीं, तेव्हां सुग्रीव आणि रामचंद्र हताश झाले. इतक्यांत पूर्व, पश्चिम, आणि उत्तर दिशेला गेलेली मंडळी निराशेने परत आली. त्यांना