Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
सीताचरित्र.

कांहीं दोष नाहीं. परंतु आपल्या या कठोर भाषणाने माझ्या मनाला अत्यंत पीडा होत आहे. मी निष्कपट भावानें आपल्या कल्याणाकरितां बोलत होतों, याबद्दल ईश्वर साक्षी आहे. इतक्या वरही जर आपण माझ्याविषयी शंका घेत असाल तर आपल्याला धिक्कार असो. आपल्या बुद्धींत असा भयंकर फरक पडणें, हें आपल्या आपत्तीचे सूचक आहे. मी वडील बंधूच्या आज्ञेचें पालन करण्यास पहात होतो; पण आपण मला तसे करू देत नाहीं. आपण आपल्या स्त्रीस्वभावाला अनुसरून माझ्याशीं हैं भाषण केलें. आतां ईश्वर आपले रक्षण करो. आपल्या म्हणण्याप्रमाण मी रामचंद्राकडे जातो. मला या वेळीं फार वाईट शकून होत आहेत. ईश्वर व वनांतील प्राणी आपले संरक्षण करोत. हे परमा- त्मन्, आम्ही दोघे बंधु परत आलों म्हणजे सीतेला या कुटीत कुशल पाहू, एवढीच आपण कृपा करा.'

( वा. रा. कां. ३. सर्ग ४५ ).

 लक्ष्मणाचें हें वरील भाषण ऐकून सीतेनें त्यावर कांहींएक उत्तर दिले नाहीं. ती ओक्साबोक्शी रडूं लागली. ही फार हट्टी आहे, आपला हट्ट केव्हांही सोडणार नाहीं, आणि आपल्या सांगण्यानें हिची समजूतही पटावयाची नाहीं, असें लक्ष्मणानें पाहिलें तेव्हां तो रागारागाने रामचंद्राकडे निघून गेला.
 लक्ष्मण निघून गेल्यावर सीता एकटीच आपल्या कुटीत त्याची व रामचंद्राची मार्गप्रतिक्षा करीत बसली. कांहीं वेळ गेल्यावर त्या कुटीच्या दाराशी एक संन्याशी येऊन उभा राहिला. त्यानें गेरूनें भगव केलेली वस्त्रे परिधान केली होती. त्याच्या डाव्या हातांत दंड व उजव्या हातांत कमंडलु होता. जेव्हां तो संन्याशी कुटीच्या दाराशी येऊन पोहोंचला, आणि त्यानें सीतेला पाहिलें, तेव्हां तिचें अलौकिक सौंदर्य पाहून तो मनांत अगदीं चकित होऊन गेला.