Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२

करून ज्यावेळेस सीता आपल्या पतीच्या कंठांत घालीत असे, व अनेक जातींच्या फुलाचे दागिने करून ते ती आपल्याही अंगावर घाली, त्यावेळेस तिला जो आनंद वाटे त्याचे वर्णन कोण करणार ! आपल्या प्रिय पत्नीला पुप्पालंकारांनी अलंकृत पाहून रामचंद्राच्या हृदयांत एक प्रकारचा अद्भुत भाव उत्पन्न होई. एक वेळां राम- चंद्रांनी स्वतः फुले तोडून आणून त्यांचें एक कर्णभूषण वनविले, व प्रेमाने आपल्या हातांनी त्यांनी ते तिच्या कानांत घातलें. पति- देवाच्या हातून आपला इतका आदर झालेला पाहून सीता लज्जेनें अगढ़ चूर होऊन गेली. त्यावेळेस लज्जा व आनंद हे दोन भाव एकाच वेळी तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होते. केव्हां केव्हां सीता आपल्या पतीबरोबर सरोवरांतील उमललेली कमळे तोडावयास जात असे. तेव्हां गोदावरीच्या तीरावर राजहंस व सारस पक्षी बसलेले पाहून तिचे मन प्रफुल्लित होई. ती ज्यावेळेस रामचंद्राव- रोवर हलके हलके गोदावरीच्या कांठानें फिरत असे, त्यावेळेस तिच्या नूपुरांचा मंजुळ ध्वनि ऐकून राजहंसहि चकित होऊन तिच्याकडे पहात, आणि तिच्या मंदगतीचें अनुकरण करीत. केव्हां केव्हां ती त्यांच्याबरोबर उंच पर्वताच्या शिखरावरहि जात असे. त्यांचे सौंदर्य पाहून ती आनंदित होई. रामचंद्र व सीता हीं दोघे जशीं वनाची शोभा पाहून आनंदित होत असत, तसाच लक्ष्मणहि आपल्या धार्मिक वर्तनाने आपल्या ठिकाणी आनंदमन होई. त्या उभतांची आज्ञा मनापासून पाळणें, व त्यांची मनो- भावानें सेवा करणे हाच लक्ष्मणाचा मुख्य धर्म होता. त्या धर्माचें पालन करण्यांत तो नेहमी तत्पर असे. तो नित्य गोदावरीचें जल तशींच वनांतून फळें, मूळें, कंद, दुर्वा व समिधा आणि दुसऱ्याहि अनेक आवश्यक वस्तु आणीत असे. त्याची परिचर्या पाहून तीं संतुष्ट होत. सीता आणि रामचंद्र जेव्हां एकांतांत बोलत बसत