Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिसरें कांड

१०१

तर तुला अजून त्या गोष्टींचा पत्ताहि नाहीं. त्या अद्याप तुझ्या स्वप्नांत सुद्धां आलेल्या नाहींत. ज्या आश्रमांत तूं पतीसह स्वतंत्र- ते राहून आनंद उपभोगीत आहेस, त्याच आश्रमांत एके दिवशीं आपल्या प्राणेश्वराच्या वियोगामुळे तुला विलाप करीत बसावें लागेल ! तुझ्या हाहा:कारानें व हृदयविदारक रोदनानें सर्व आकाश भरून जाईल. हाय ! ज्या स्थलाला सीतेनें आनंदभवन मानलें होतें, कारण तें स्थलहि तसेंच रमणीय होतें, तेंच स्थल एके दिवशी तिला नरकाहूनही अत्यंत भयावह होईल, हें कोण बरें सांगू शकेल !
 अशा त्या सुंदर पंचवटीमध्ये रामचंद्र, सीता लक्ष्मणासह राहू लागले. तेथे रहात असतां सीतेनें व लक्ष्मणाने त्यांची श्रद्धापूर्वक पुष्कळ सेवा केली. त्या उभयतांच्या सुश्रुषेमुळें रामचंद्राचे अंत:- करण फार प्रसन्न झालें. जेव्हां त्यांच्या आश्रमासमोर रंगी बेरंगी पिसान्यांचे मोर आपापले पिसारे पसरून आनंदानें नृत्य करीत, तेव्हां ती मौज पाहून सीतेला फार आनंद होई. प्रातः काली सीता जेव्हां रामचंद्राबरोबर फिरावयास जाई तेव्हां मार्गात इकडून तिकडे व तिकडून इकडे बागडत असलेली हरिण बालके मृगनयनी सीतेकडे पाहून स्तब्ध उभीं रहात. सीतेची ती सौम्य व रम्य मूर्ति पाहून तीं किंचित देखील भीत नसत. तीं केव्हां केव्हां निःशंक पणाने तिच्या तोंडाकडे पहात पहात चरत असत. कांहीं हरिण बालकें तर शांत स्वभावाच्या सीतादेवीचीं इतकीं परिचयाची झाली होतीं कीं, जणू काय ती तिचीं पाळलेलीच आहेत. तीं सीतेच्या मागून मागून नेहमीं फिरत. त्यांच्या पर्णकुटीजवळच्या वृक्षांवर नानाप्रकारचे पक्षी येऊन बसत, आणि अनेक प्रकारचे शब्द करून त्यांच्या कानांत जणूं काय अमृतधारांचा वर्षाव करीत. आपल्या सुंदर करकमलांनी सुगंधित पुष्पांच्या माला-