Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिसरें कांड

९९

महिने, तर कुठे एखाद दुसरा आठवडा. याप्रमाणें त्यांनी त्या वनांत तेथील आनंदाचा उपभोग घेत सुमारें दहा वर्षे काढिली.
 याप्रमाणें दंडकारण्यांत हिंडून सत्यप्रतिज्ञ रामचंद्र सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमांत परत आले. तेथें ते मग कांहीं दिवस स्वस्थपणें सुखानें राहिले. तेथें रहात असतां त्यांना एके दिवशीं अगस्ति ऋषीचे दर्शन झाले. त्यांना भेटून रामचंद्राला आनंद झाला. अगस्ति मुनीच्या आश्रमाचें दर्शन करून ते नंतर त्याचा बंधु इध्मवाहन याच्या तपोवनांत गेले. ते तपोवन रमणीय होतें. तेथून परत येतांना ते पुनः अगस्ती ऋपीला भेटले. त्या तिघांचा विनयशीलपणा पाहूम अगस्ती ऋषीला प्रसन्नता वाटली व त्यांनी त्या तिघांना उत्तम आशीर्वाद दिला. नंतर ते रामाला म्हणाले ' या वनांत फिरून फिरून तुम्हीं दमत असाल; सीतेला तर श्रम मुळीच सहन होत नसतील. तसेंच या वनांत हिंडतांना तिला फार दुःखहि होत असेल तर आतां हे रामा, सीतेला सुख मिळेल असा कांहीं उपाय कर. तिनें तर, आपले कर्तव्य करून जीवित- साफल्य केले आहे. राजवैभव सोडून ती तुझ्याबरोबर वनांत आली, या कारणानें तिचें नांव पतित्रता, व पूजनीय स्त्रियांत गणले जाईल, तुम्हांला वाटेल तर तुम्ही सर्वजण या आश्रमांत सुखानें रहा.
 हें अगस्ती मुनी भाषण ऐकून ' येथे एखादें एकांत स्थान कुठे आहे कां ' म्हणून रामचंद्रांनी त्यांना विचारिलें. किंचित् निचार करून त्यांनी एक स्थळ सांगितलें. तें त्यांच्या आश्रमापासून सात आठ कोस दूर होतें. तें फार रम्य होते. अगस्ती मुनीच्या सांग- यावरून रामचंद्रांनी तेथे जाण्याचा निश्चय केला, आणि लगेच मुनीला वंदन करून ते त्या स्थळाकडे निघून गेले. तें स्थान पंचवटी होय.
 पंचवटीची शोभा पाहून त्यांचें मन सुप्रसन्न झाले; आणि पंच-