पान:सिंचननोंदी.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसिद्ध होऊ लागले आहे. ही मराठी भाषेच्या दृष्टीने, जनसामान्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. शेती आणि पाण्यासंबंधी मूलभूत स्वरूपाचे वाङमय मोठ्या प्रमाणात लिहिले जावे असे मला अनेक वर्षांपासून वाटत होते. श्री. पुरंदरे यांचा 'सिंचनोंदी' हा ग्रंथ पाहिल्यानंतर मराठी भाषेतही आता जनजीवनाचे सर्वांगीण प्रतिबिंब पडू लागले आहे असे अभिमानाने म्हणावेसे वाटते. आमचे मित्र महाकवि श्री. ना.धों. महानोर यांच्या शेतकरी जीवनासंबंधीच्या आणि शेती प्रश्नांसंबंधीच्या ज्या प्रतिभाशाली कविता आहेत. त्यामुळे शेतीविषयक मौलिक आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या वाङमयाची मराठी भाषेच्या 'वैभवात भर पडत आहे. अलीकडील काळात दलित वाङ्मयाने मराठी भाषेची मोलाची सेवा केली आहे. तरी पण शेतीच्या प्रश्नांसंबंधी अजूनही मराठी भाषेतील वाङ्मयास लांबचा पल्ला गाठावयाचा आहे. श्री. पुरंदरे यांचा ग्रंथ शेती आणि पाणी या विषयांवर प्रेम असलेल्या सर्व मराठी भाषिकांना वाचण्यासारखा आहे. श्री. प्रदीप पुरंदरे यांनी या ग्रंथापुरतेच त्यांचे लिखाण मर्यादित न ठेवता शेतीविषयक आणि पाणीविषयक अधिक लिखाण करून शेती आणि पाणी विषयांच्या विचारमंथनात भविष्यकाळातही अशीच मोलाची भर घालावी असे मला वाटते. श्री. पुरंदरे यांच्या लिखाणात तसे सामर्थ्यही आहे.

अण्णासाहेब शिंदे