पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्या कार्यशैलीने स्वतंत्र भारताची प्रतिमा उंचावून दाखवली होती. लेखकाला ही मूल्यांकनाची संधी चालून आलेली. त्यांनी स्पष्ट केले आहे की, नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर कृषी-औद्योगिक विकासाचे धोरण अंगीकारले. एकीककडे भिलाई, राऊरकेला, दुर्गापूरमध्ये जड उद्योगांची उभारणी तर दुसरीकडे हिराकुंड, भाक्रा-नानगलसारख्या महाधरणांच्या निर्मितीतून उद्योगाला वीज व शेतीला पाणी असा दुहेरी फायद्याच्या योजना, प्रकल्पांतून नेहरूंनी ग्रामीण व नागरी प्रगतीची समांतर गती मिळवून दाखवली. शिक्षण, विज्ञान, संशोधनाच्या क्षेत्रात प्रगती करण्याचे धोरण अंगीकारून विद्यापीठे, राष्ट्रीय संशोधन संस्थांची स्थापना, अणु ऊर्जा विकास साधण्यासाठी रशिया व अमेरिका दोन्ही महासत्तेचे साहाय्य मिळवण्यात नेहरूंना आलेले यश त्यांच्या पंचशील धोरणाचेच यश म्हणावे लागेल. गोवा मुक्ती, पाकिस्तान व चीन सीमेवरील कुरबुरींना उत्तर, कोरिया मध्यस्थी अशांतून त्यांनी भारताचे आंतराष्ट्रीय वजन सिद्ध केले. अशोक, अकबर, महात्मा गांधी यांचे शांती, सद्भाव, ऐक्याचे अनुभव नेहरूचे पाथेय ठरले. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सारख्या ग्रंथातून नेहरूंचं भारतीय इतिहास व संस्कृतीविषयक आकलन पुरेशा प्रमाणात व्यक्त झालेले आहे. इंग्रजांचे योगदान व इंग्रजांद्वारा झालेली भारताची हानी दोन्हीचे भान नेहरूंना होते. त्यामुळे इंग्रजांकडून लाभलेला प्रशासकीय वारसा स्वीकारत भारतीय प्रश्न सोडवण्याचे उपाय त्यांनी विदेशी तज्ज्ञांवर सोपवले नाहीत. एतद्देशीय बुद्धिजीवींना हाताशी धरून त्यांनी मांडलेला विकास पट पाहात असताना एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांना भारताच्या नरमबिंदूची जाणीव होते नि बलस्थानांविषयी विश्वासही होता. त्यामुळे नव स्वतंत्र राष्ट्र असून ते नेहरू शक्तिशाली बनवू शकले.


३१. महानांचे मन्वंतर


 भारताचे स्वातंत्र्य केवळ राजकीय संघर्षाने प्राप्त झाले असे म्हणणे इतिहाससापेक्ष होय. पण समग्रता भारतीय स्वातंत्र्याचे आकलन सांस्कृतिक पुनर्जागरण समजून घेतल्याशिवाय करता येणार नाही. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहास केवळ राजकीय नसून समाजसुधारणा व सांस्कृतिक प्रबोधनाचाही आहे. स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, सय्यद अहमद खान, मौलाना अब्दुल कलम आझाद, महाकवी मोहमद इकबाल, लोकमान्य टिळक प्रभृतींचे योगदान राजकीय चळवळीइतकेच

साहित्य आणि संस्कृती/९८