पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२१. अकबरानंतर

 अकबरानंतरचे सतरावे शतक म्हणजे जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेबाचा शासन काळ. परस्पर विरुध्द वृत्तीचे मुघल भारतीय जनतेने अनुभवले. न्यायी राजा, कलासक्त राजा आणि क्रूर राजा. मराठी साम्राज्याचा अभ्युदय झाला तो याच काळात. छत्रपती शिवरायांचा हा धगधगता कालखंड. मुघल, मराठे, शीख एकमेकांस भिडले याच कालखंडात पण समग्रतः मुघल राजवटीचे सिंहावलोकन, मूल्यमापन करत असताना लक्षात येते की, मुघलांनी भारतात काश्मीर ते कन्याकुमारी अखंड साम्राज्य निर्माण केले. ते एका धर्माचे नव्हते. होते राष्ट्रीय साम्राज्य. हिंदू-मुसलमान दोघांना विकासाची संधी मुघल काळाने मिळवून दिली. त्या अर्थाने सन्मान्य अपवाद वगळता मुघल साम्राज्य उदारमतवादी होते. विदेशी व्यापार वृद्धीचा हा कालखंड. राष्ट्रीय ऐक्याची मुहूर्तमेढ रोवली गेली तो काळ. शेती व शासन एकत्र नादणे कठीण असते खरे, पण या काळाने ते खोटे ठरवले. वाहतूक सुधारणा या काळात घडल्या. साहित्य, कलांना सुगीचे दिवस आले. वास्तुकलेचे अजरामर नमुने याच काळाची देणगी. ताजमहाल, लाल किल्ला, फत्तेपूर सिक्री इ. मुघलांची निर्मिती. तानसेनचे संगीत असो वा राजस्थानी चित्रकला याच काळात अमर झाली. उर्दू, ब्रज, अवधी भाषांचा हा विकासकाळ. मुक्तिबोधांनी तो आत्मीयतेने रेखाटला आहे.


२२. सातासमुद्रापलीकडची जहाजे

 मुघल साम्राज्याचा -हास होऊन मराठा आणि शिखांची शक्ती वाढली. पण याच काळात ब्रिटिश शासकांनी आपला साम्राज्य विस्तार सुरू केल्याने एतद्देशीय साम्राज्य क्षणिक ठरले. भारताचा संपर्क ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा युरोपीय शक्तींशी येऊन सामाजिक, प्रशासकीय सुधारणांतून मन्वंतर घडून आले. प्लासीच्या लढाईने एतद्देशीय सत्ता -हास पावून ब्रिटिश सत्तेचा उदय झाला. अंतर्गत कलहामुळे मराठे, शीख, रजपूत राजे हारले. देशी संस्थानांनी तैनाती फौज पदरी ठेवून मांडलिकत्व स्वीकारले. हा अध्याय म्हणजे मुक्तिबोधांच्या दृष्टीने भारतीय पराभवाच्या कारणांची मीमांसा होय. ती त्यांनी विस्ताराने येथे केल्याचे वाचताना लक्षात येते.

साहित्य आणि संस्कृती/९२