पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते मागे टाकतात. हिंदू-मुस्लीम भेदात आपण आजवर ते का करू शकलो नाही असा प्रश्न करणारा हा अध्याय वाचकांना अंतर्मुख करत बदलाचे आव्हान करतो म्हणून महत्त्वाचा.

 अकरा ते चौदावे शतक भारतीय इतिहासात हिंदू-मुस्लीम संघर्षाचे नोंदले गेले असले तरी ते हिंदू-मुस्लीम समन्वय आणि सद्भावाचेही होते हा इतिहास आपणास नाकारता येणार नाही. भारत : इतिहास और संस्कृति ग्रंथ मुक्तिबोधांनी ज्या जबाबदारीने लिहिला त्याचा पट मोठा व्यापक व उदार खरा. पण एक दोन वाक्यांचे भांडवल करून वादंग करण्यामागे प्रतिगामी शक्तींना समाजात सामंजस्य निर्माण करण्यात रस नसतो, हेच वारंवार सिद्ध होत आले आहे. तशाच अर्थाने या ग्रंथाची सामाजिक भूमिका स्पष्ट करणारे हे प्रकरण. यात मुक्तिबोधांनी कितीतरी उदाहरणातून उभय धर्मातील सामंजस्य देवघेव अधोरेखित केली आहे. शासक मुस्लीम होते खरे. पण हाताखालची यंत्रणा हिंदूच होती. मुस्लीम शासक मंदिर, समाधी बांधण्यास देणग्या देत. ते हिंदू मंदिरांना भेटी देत. साधू, संतांना भेटत त्यांचे आशीर्वाद घेत. प्रजा या मुस्लीम शासकांना ‘जगद्गुरू' संबोधायची. मुसलमान हिंदू पगडी वापरत. मुसलमान स्त्रिया बांगड्या भरू लागल्या. मुसलमानांनी रजपुतांच्या जोहार' प्रथेचा अंगीकार केला होता. हे जसे खरे तसे मुसलमानांनी मागास जातीत धर्मांतर घडवून आणले होते हे लिहिण्यास मुक्तिबोध विसरत नाही. इतिहास तटस्थपणे लिहायचा व संस्कृती सामंजस्याने विशद करण्याचा मुक्तिबोधांच्या लेखणीचा संस्कार त्यांची राष्ट्रीयता सिद्ध करणारा. ते कम्युनिस्ट होते, पण राष्ट्रद्रोही नव्हते यांचे किती तरी पुरावे या विवेचनात आढळतात. त्या काळात क्षत्रिय व ब्राह्मणांचे जे व्यवसाय जिवंत ठेवण्याचे उद्योग चालत (युद्ध चालू ठेवणे, धार्मिक भेद राखणे, सुतावरून स्वर्गाला जाणे, कुरापती शोधणे इ.) त्याही मुक्तिबोधांनी नोंदल्या आहेत. पण त्यांचे लेखन लक्ष्य विधायक समाजबांधणीचे होते. हिदू मुसलमान कबरीवर मिठाईप्रसाद ठेवत तर दुसरीकडे हिंदू कुराण श्रवण करीत, हा झाकलेला इतिहास मुक्तिबोध प्रकाशात आणतात. या खंडात मुक्तिबोधांनी सामाजिक, आर्थिक, साहित्यिक, सांप्रदायिक, धार्मिक सर्वांगांनी काळाचे संयमित चित्रण केले आहे. अनेक अप्रकाशित घटनांवर झोत टाकणारे हे प्रकरण वाचकांना काळाचा जिवंत चित्रपट दाखवते. ही चित्रशैली या ग्रंथाचे बलस्थान म्हणून नोंदवावसे वाटते.

साहित्य आणि संस्कृती/९०