पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राज्य गुलाम, खिलजी, वुगलल, सय्यद, लोदी इत्यादी अनेक घराण्यांनी मिळवलं नि उपभोगलं. सन १३00 पर्यंतचा हा सारा इतिहास लढाया, चढाया, आक्रमणे यामुळे नुसता घुसळून निघाल्याचे दिसून येते.


१८. मध्ययुगीन सांस्कृतिक विकास आणि मानवी सामंजस्य


 हे या ग्रंथातील सर्वाधिक महत्त्वाचे प्रकरण होय. कारण यात मुक्तिबोधांनी इतिहास आणि संस्कृतीची मार्मिक मीमांसा केलेली आहे. मुक्तिबोध केवळ साहित्यिक, कवी, नव्हते तर समाजशील चिंतक म्हणून ते समग्र जीवनाकडे मोठा गांभीर्याने पाहात असत. हिंदू-मुसलमानांतील संघर्ष हा केवळ धार्मिक विरोधाचा नव्हता, तर त्यामागे जीवन अस्तित्वाची विजिगीषू वृत्ती कार्यरत होती; हे मुक्तिबोधांचे निरीक्षण म्हणा वा निष्कर्ष - समाजभान म्हणून महत्त्वाचं ठरतं. अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, माणूस संघर्षशील, प्रयत्नशील का असतो याचा शोध घेतानाचे मुक्तिबोध समाजशील असतात, म्हणून त्यांना हे सारं समजत, उमजत राहतं.

 “मुस्लीम शासन काळातील आरंभिक शासकांत मुस्लीम परदेशी होते. परंतु हळूहळू त्यांचे भारतीयीकरण झाले. एकीकडे संकुचितता तर दुसरीकडे उदारता या परस्परविरुद्ध संघर्षात उदार देवाणघेवाणीचाच विजय झाला. इस्लाम संपर्काने सामान्यजन जागे झाले. भक्ती आंदोलनाने समाजांत जागृती घडवली. समाजातील मागास जातीत संत, कवी उदयाला आले. विशेष म्हणजे ते हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही समाजात आदरणीय म्हणून स्वीकारले गेले. या काळात प्रथमच मागास वर्गास प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांनी सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. हिंदू-मुस्लीम समाजात ऐक्य निर्माण झालं. मानवी कल्याणाच्या भावनेने जाती, धर्माच्या भिंती गौण ठरवत त्या पाडण्याचा प्रयत्न केला. भारताच्या या आध्यात्मिक मानवी समन्वय युगाने महान पुरुष जन्माला घातले." मुक्तिबोधांचे हे समकालाचे सामाजिक आकलन मला अधिक महत्त्वाचे वाटते. या प्रकरणात मुक्तिबोधांनी हिंदू-मुस्लीम संघर्षाबरोबर समन्वयाचे बारीक-सारीक तपशील लिहिले आहेत. जिज्ञासूंनी ते मुळातून अशासाठी वाचले पाहिजे की त्याशिवाय वर्तमान आपणाला उमजणार नाही. इतिहास भविष्याचा पाया असतो हे खरे. पण तो चांगला समाज शिक्षकही असतो. इतिहासातील विधायक गोष्टींचं अनुकरण करणारे देश, समाज ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनि' म्हणत अनिष्ट

साहित्य आणि संस्कृती/८९